मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला. रविवार १४ सप्टेंबरच्या रात्रीपासून सोमवार १५ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला. विश्रांतीनंतर मुंबईत इतका जास्त पाऊस पडण्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुढील दोन ते तीन दिवस अतिजोरदार पावसाची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. राज्याच्या घाट क्षेत्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान चारही विभागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळेच मुंबई आणि आसपासच्या शहरांतील पावसाचा जोर वाढला आहे. पावसासोबत ताशी ३० ते ४० किमी. वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आणखी दोन चार दिवस पावसाचा जोर असेल, नंतर पावसाचा जोर ओसरेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पावसाचा जोर वाढल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या स्थितीची तातडीने दखल घेतली आहे. नियमानुसार आवश्यक त्या प्रक्रियेअंती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले.