अर्धवट कामे पूर्ण झाल्यानंतरच नवीन रस्त्यांची कामे सुरू होणार
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने खड्डेमुक्तीच्या दृष्टिकोनातून टप्पा एक आणि टप्पा दोन अंतर्गत एकूण २१२१ रस्त्यांची कामे हाती घेतली असून यातील आतापर्यंत ७७१ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत; परंतु उर्वरितपैंकी ५७४ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी अर्धवट होती, ही सर्व अर्धवट रस्त्यांची कामे येत्या ऑक्टोबर महिन्यात हाती घेतली जाणार असून ही अर्धवट रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित सुरु न झालेली कामांना सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे सध्या अर्धवट आणि हाती न घेतली कामे टप्प्याटप्प्याने हाती घेत मे २०२७ पर्यंत सर्व रस्त्याची कामे सिमेंट काँक्रीटची केली जाणार आहेत.
महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत दिनांक ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रीटकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत, ७७१ रस्त्यांचे एकूण १८६ किलोमीटर लांबीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, ५७४ रस्त्यांवर चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत याप्रमाणे मिळून एकूण १५६.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत.
टप्पा १ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ६३.५३ टक्के तर, टप्पा २ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ३६.८४ टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली आहे. म्हणजेच टप्पा १ आणि टप्पा २ असे एकत्रित मिळून पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ४९.०७ इतकी आहे. पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच दिनांक १ ऑक्टोबर २०२५ पासून काँक्रिटीकरण कामे पुन्हा वेगाने सुरू केली जाणार आहेत. खड्डेमुक्त मुंबई हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे रस्ते काँक्रिटीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ही कामे सुरू असताना नागरिकांना असुविधा होणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील कामे मे २०२६ आणि दुसऱ्या टप्प्यातील कामे मार्च ते मे २०२७ पूर्वी पूर्ण केली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, एकाच वेळेला एकाच भागातील दोन ते तीन रस्त्यांची कामे हाती घेणार नाही, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल. हे सिमेंटीकरण करताना ३० ते ४० मीटरचा ब्लॉक घेवून रस्त्याची कामे केली जातात. तसेच सोसायटीचे गेट ज्यावेळेस बंद असतात, त्याचवेळी तेथील रस्त्याची कामे केली जातात असेही त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते काँक्रिटीकरण (टप्पा १ व २) माहिती
रस्ते संख्या - २१२१
एकूण लांबी - ६९८.७३ किलोमीटर
काँक्रिटीकरणाची पूर्ण झालेली कामे
रस्ते संख्या - ७७१
एकूण लांबी - १८६.०० किलोमीटर
काँक्रिटीकरणाची अंशत: पूर्ण झालेली कामे
रस्ते संख्या - ५७४
एकूण लांबी - १५६.७४ किलोमीटर
सुरू होणारी काँक्रिटीकरणाची कामे
रस्ते संख्या - ७७६
एकूण लांबी - २०८.७० किलोमीटर.