मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने काही अटी शर्तींवर परवानगी दिली आहे. हा मेळावा शिवसेनेच्या पारंपरिक मैदानावर होणार असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. येत्या २ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे पक्षाची धोरणे, विरोधकांच्या टीका आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई मनपाने ध्वनिप्रदूषण नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, स्वच्छता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे, अशा विविध अटींवर परवानगी दिली आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे.
दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे जुने नाते आहे. १९६६ मध्ये पक्ष स्थापनेनंतर पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून हा मेळावा पक्षाच्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांना संबोधित करण्याचे व्यासपीठ बनले आहे. बाळासाहेबांच्या काळात या मैदानावर अनेक दमदार सभांचे आयोजन झाले. ज्यात त्यांच्या ठाकरी भाषेतील भाषणांनी लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.
बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांमुळे शिवसेनेची ओळख 'मराठी अस्मिता' आणि 'हिंदुत्व' यांच्याशी जोडली गेली. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे आणि शिंदे गटांत संघर्ष होत आला आहे. २०२२ मध्ये शिवाजी पार्कचे प्रकरण न्यायालयात गेले होते. पहिल्यांदा अर्ज केल्याने आम्हाला मैदान मिळावे, असा ठाकरे सेनेचा दावा होता. या वादात न्यायालयाने ठाकरे यांच्या बाजूने कौल दिल्यानंतर शिंदे गटाने बीकेसीत मेळावा घेतला होता.