Thursday, March 26, 2026

Heavy Rains Hit Punjab : पाऊस-पूर-भूस्खलनाची तिहेरी संकटे; भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प, २३ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Heavy Rains Hit Punjab : पाऊस-पूर-भूस्खलनाची तिहेरी संकटे; भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प, २३ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तर भारतातील इतर भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते, रेल्वे आणि वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे हरिद्वारमधील बोगद्याजवळ रेल्वे ट्रॅकवर भूस्खलनामुळे प्रचंड ढिगारा पडला होता. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक तब्बल ११ तास ठप्प झाली. दरम्यान, २३ हून अधिक गाड्यांच्या वेळापत्रकात अडथळे निर्माण झाले असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून ढिगारा हटवण्याचे काम हाती घेतले आणि नंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

पंजाबमध्ये पूरस्थिती गंभीर; ५१ मृत्यू, लाखो लोक प्रभावित

उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. पंजाबमध्ये पुरामुळे मृतांचा आकडा ५१ वर पोहोचला असून, तब्बल ३.८७ लाख लोक प्रभावित झाले आहेत. याशिवाय ४.३४ लाख एकर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने प्रति एकर २०,००० रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्येही जोरदार पावसामुळे अनेक रस्ते बंद आहेत, तर वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. श्रद्धाळूंना मोठा धक्का बसला आहे कारण कटरा येथील माता वैष्णोदेवी यात्रा सलग १४व्या दिवशीही स्थगित ठेवावी लागली आहे. दरम्यान, हरिद्वारमधील काली माता मंदिराजवळ भीमगोडा रेल्वे बोगद्याजवळ डोंगरावरून ढिगारा कोसळला. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर अडथळा निर्माण झाला. विशेष म्हणजे, एका महिन्यात अशी ही दुसरी घटना नोंदवली गेली आहे, ज्यामुळे रेल्वे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हरिद्वार रेल्वे बोगद्याजवळ ढिगारा; २३ गाड्या ठप्प

उत्तराखंडमधील मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. हरिद्वारजवळील भीमगोडा रेल्वे बोगद्याजवळ डोंगरावरून ढिगारा पडल्यामुळे डेहरादून-ऋषिकेश आणि हरिद्वारदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेचा परिणाम २३ गाड्यांवर झाला असून, चंदौसी–ऋषिकेश, हावडा–योगनगरी ऋषिकेश दून एक्सप्रेस, अमृतसर–देहरादून एक्सप्रेस आणि बारमेर–ऋषिकेश एक्सप्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या रद्द अथवा विलंबित झाल्या. प्रवाशांच्या गैरसोयीचा विचार करून प्रशासनाने पाच बसेसची व्यवस्था केली आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षित पोहोचवण्यात आले. तब्बल ११ तासांच्या खंडित सेवेनंतर सोमवारी सायंकाळी पाच वाजता ट्रॅकवरील अडथळा दूर करण्यात आला आणि वाहतूक पुन्हा सुरु झाली.

मृतांचा आकडा ५१ वर, लाखो एकर पिके उद्ध्वस्त

पंजाबमधील मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या पुरामुळे राज्यातील ४.३४ लाख एकर शेती पाण्याखाली गेली असून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः बासमती तांदळाच्या निर्यातीवर २५ टक्क्यांपर्यंत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी आतापर्यंत २३,०१५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. प्रभावित भागात बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू असून, प्रशासनाने पीडितांसाठी निवारा आणि अन्नसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

बचावासाठी ३० हेलिकॉप्टर तैनात

प्रशासनाने सांगितले की १२३ मदत छावण्यांमध्ये सध्या ५,४१६ नागरिक राहत आहेत. पुरामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी या छावण्यांमध्ये निवारा, अन्न आणि आरोग्यसुविधा पुरवल्या जात आहेत. दरम्यान, लष्कराने ३० हेलिकॉप्टर तैनात केली आहेत, ज्यांच्या मदतीने पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. तसेच, बीएसएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी जमिनीवर मदतकार्य हाती घेतले आहे. शेतकऱ्यांसाठी मात्र ही परिस्थिती मोठा धक्का ठरत आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, पुरामुळे सुमारे १२ लाख टन तांदळाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. यामध्ये ६ लाख टन बासमती तांदळाचे नुकसान समाविष्ट असून, राज्याच्या निर्यात क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment