नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांच्या त्रासाचा विचार करून वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात जड वाहनांच्या (ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रेलर इत्यादी) वाहतुकीवर काही वेळेसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, ८ सप्टेंबरपासून पुढील एक महिना दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत शहरात कोणत्याही जड वाहनांना प्रवेश निषिद्ध असेल. नागपूर शहरातून फक्त रात्री १० नंतर ते सकाळी ६ पर्यंतच अशा प्रकारची वाहने शहरात येऊ शकतील.
शहरातून फक्त जात असलेल्या किंवा शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या ट्रक वगैरे वाहनांनी फक्त बाह्य रिंगरोडचा वापर करावा, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. जर कुणी या नियमांचं उल्लंघन केलं, तर संबंधित वाहनचालकावर १०,००० रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
नवीन वाहतूक अधिसूचनेनुसार, सर्व जड वाहने आता नागपूर शहराच्या बाहेरूनच वळवण्यात येणार आहेत, आणि त्यासाठी बाह्य रिंगरोडचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
या निर्णयाअंतर्गत, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, रायपूर, जबलपूर आणि मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी निश्चित मार्ग आखण्यात आले आहेत, जेणेकरून शहरात वाहतूक कोंडी कमी होईल आणि अपघातांचे प्रमाण घटेल.
तथापि, काही अत्यावश्यक वाहतुकीसाठी विशेष परवानग्या दिल्या जातील. यामध्ये:
भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) अजनी येथील गोदामात जाणारे ट्रक
रेल्वे मालधक्का (Goods Shed) पर्यंत पोहोचणारी वाहने
संत्रा मार्केटमध्ये पुरवठा करणारे ट्रक
हे ट्रक विशेष परवानगी घेऊन ठराविक वेळेतच शहरात प्रवेश करू शकतात. यामुळे नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरळीत होईल. हा निर्णय नागपूरच्या रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी घेण्यात आला आहे. पोलिस यंत्रणेला विशेष पथके तयार करून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.