मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्ट पासून अटल सेतूसह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कर अधिनियम १९५८ अंतर्गत निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना वाहनांना ठराविक मार्गांवरून प्रवास करताना टोल नाक्यांवरून सूट देण्यात आली आहे. त्यानुसार शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, कोणत्या इलेक्ट्रिक चारचाकी व बस वाहनांना टोल करातून सूट दिली जाणार आहे ते पाहूया.
या श्रेणीतील वाहनांना मिळणार टोल माफी
- M2, M3, M6 श्रेणीतील इलेक्ट्रिक चारचाकी वाहने
- इलेक्ट्रिक बसेस -राज्य परिवहन उपक्रम ( STU ) तसेच खासगी इलेक्ट्रिक बसेस (M3, M6) प्रकारातील
वरील वाहनांना राज्यातील ठराविक महामार्ग व मार्गावरील टोल नाक्यांवरून टोल कर भरण्यापासून सूट राहील. ही सूट दिनांक २२ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री पासून लागू झाली आहे. शासनाचा हा निर्णय राज्यातील पर्यावरणपूरक वाहतूक व स्वच्छ ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.