मुंबई : जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी केला. या निर्णयामुळे ओबीसी समाज नाराज आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील राज्य सरकारच्या नव्या जीआरविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जाहीर केले. तसेच सध्या ओबीसी नेत्यांकडून सुरू असलेले आंदोलन आणि जीआर फाडणे थांबवावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना केले आहे.
मराठा आरक्षणाबाबत मंगळवारी महाराष्ट्र शासनाने एक जीआर जारी केला आहे. या जीआरमध्ये असलेल्या काही शब्दांबाबत अद्याप संभ्रम आहे. यामुळे ओबीसींच्या अनेक संघटनांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे, काही ठिकाणी मोर्चे, तसेच अनेक ठिकाणी शासन निर्णयाची होळी असे प्रकार केले आहेत. इतर जे ओबीसींचे नेते आहेत त्यांच्याशी देखील मी चर्चा करत आहे, असे भुजबळ म्हणाले. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले.