नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात जीएसटीत बदल करुन मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. मोदी सरकारने या आश्वासनाची पूर्तता जीएसटी काउन्सिलच्या बुधवार ३ सप्टेंबरच्या बैठकीद्वारे केली. जीएसटी काउन्सिलने जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द केला. आता जीएसटीचे पाच आणि १८ टक्के हे दोनच स्लॅब अस्तित्वात आहेत. चर्चेअंती जीएसटी काउन्सिलने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. जीएसटी काउन्सिलचे निर्णय २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत.
एअर कंडिशनर, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन यासारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंवर आता २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी लागू होईल. यामुळे या सर्व वस्तू स्वस्त होतील. तूप, काजू, बाटलीबंद पाणी (२० लिटर), नमकीन, पादत्राणे, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर आता १२ ऐवजी पाच टक्के जीएसटी लागू होईल. यामुळे या सर्व वस्तू पण स्वस्त होतील. पेन्सिल, सायकल, छत्री आणि हेअरपिन यासारख्या सामान्य घरगुती वस्तू देखील स्वस्त होतील.
दुग्धजन्य पदार्थ, UHT दूध, कंडेन्स्ड मिल्क, बटर, तूप, पनीर, चीज, माल्ट, स्टार्च, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, बिस्किटे, चॉकलेट , कोको उत्पादने, बदाम, काजू, पिस्ता, हेझलनट ,खजूर, रिफाइंड साखर, सिरप, टॉफी, कँडीज, वनस्पती तेले, खाद्यतेल, मांस, मासे उत्पादने, सॉसेज, माल्ट-आधारित अन्न, भुजिया आणि तत्सम पॅकेज, मिनरल वॉटर, खते आणि निवडक पिकांसाठी लागणारे निविष्ठा, जीवनरक्षक औषधे, काही वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य उत्पादने, पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, पादत्राणे, कापड, पेपर, केसांचे तेल, शाम्पू, टूथपेस्ट आणि डेंटल फ्लॉस, अक्षय ऊर्जा उपकरणे, बांधकाम साहित्य, क्रीडा साहित्य, खेळणी, चामडे, लाकूड, हस्तकला उत्पादने हे सर्व स्वस्त होणार आहे.