मंगळवारी गौरी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांच्या गजराने अवघ्या मुंबापुरीचे रस्ते दुमदुमून गेले होते. एकच उत्साहाचे वातावरण चहुबाजुला पहायला मिळत होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण या उत्साहात सहभागी झाले होते. अनेक घरगुती गणपतींसह काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करत मिरवणुका काढल्या होत्या. अनेक ठिकाणी पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरणही करण्यात आले. तर ढोल आणि ताशांचाही तालावर प्रत्येक जण वाजत गाजत आणि नाचत बाप्पाला निरोप देत होते.
मुंबई महापालिकेच्यावतीने गणेश भक्तांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था केली होती. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर, तसेच शहरातील विविध भागांमध्ये तयार केलेल्या कृत्रिम तलावांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक विसर्जन स्थळी प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, आणि अग्निशमन दलाची पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच, पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे यासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य देण्यात आले होते.
दीड दिवसा पर्यावरणपुरक आणि पीओपीच्या गणेशमूर्तींना समुद्रासह इतर नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जनास परवानगी नाकारल्यानंतर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने प्रदूषण नियामक मंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी याबाबतचे परिपत्रक काढून जिथे शक्य नसेल तिथे पर्यावरणपुरक गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्त्रोतात करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, गौरीगणपतीसह शाडूमातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन ज्या भागांमध्ये कृत्रिम तलावांची सुविधा नाही तिथे महापालिकेच्यावतीने समुद्रासह इतर नैसर्गिक तलावांमध्ये करण्यास परवानगी दिली होती. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू सह इतर ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा असल्याने एमपीसीबीच्या परिपत्रकानुसार विसर्जनासाठी परवानगी दिली जात होती. रात्री नऊवाजेपर्यंत २५७ सार्वजनिक गणेशमूर्ती, घरगुती गणेशमूर्ती २३२१६, गौरी २९२० अशाप्रकारे एकूण २६,३९६ गौरी आणि गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांसह काही समुद्रासह तलावांमध्ये विसर्जन करण्यात पार पडले होते.