प्रवाशांना जलवाहतुकीची प्रतीक्षा
मुंबई : सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. समुद्रातील लाटांचीही उंची कमी झालेली नाही. वाऱ्याचा वेगही कमी झालेला नाही. यामुळे गेटवे- मांडवा फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून सुरू होण्यात अनिश्चितता निर्माण झाली आहे. हवामान विभागानेही पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे ओहटीची स्थिती पाहूनच फेरीबोट सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
तीन महिन्यांच्या मान्सूनबंदीनंतर गेटवे- मांडवा जलवाहतूक १ सप्टेंबर सुरू होणार आहे. या मार्गावर फेरीबोट सेवा देणाऱ्या कंपन्यांनीही आपली सज्जता पूर्ण केली असून हवामान शांत होण्याची ते वाट पाहात आहेत. तितकीच प्रतीक्षा गौरी-गणपतीच्या सणासाठी अलिबाग-मुरुडकडे येणारे चाकरमानी करीत आहेत. त्यांचा हा सर्वात आवडीचा मार्ग असला तरी बिघडलेल्या हवामानामुळे त्यांचा प्रवास सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी सप्टेंबरच्या १ तारखेला ही फेरीबोट सुरू होते. त्यामुळे गौरी-गणपतीचा प्रवास सुखरूप करता येतो. यंदा गणपती उत्सव लवकर आल्याने जलप्रवास करीत गौरी-गणपतीसाठी गावाकडे येणाऱ्यांची संधी हुकली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण कमी होऊन फेरीबोट निर्धारीत वेळापत्रकानुसार सुरू होईल, असा अंदाज जलवाहतूक संस्थांचा आहे.
शनिवारी रात्री आणि रविवारची दुपारच्या भरतीची स्थिती लक्षात घेऊन फेरीबोट सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा हा सर्वात लोकप्रिय जलवाहतूक मार्ग आहे. या मार्गावर दररोज हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिक प्रवास करीत असतात. या सेवेवर अलिबाग, मुरुड तालुक्यातील पर्यटन व्यवसाय अवलंबून असल्याने फेरीबोट केव्हा सुरू होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. फेरीसेवेची प्रतीक्षा प्रवासी करत असले तरी अतिवृष्टीमुळे अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
अपघात टाळण्यासाठी खबरदारी
मान्सून सुरू होण्यापूर्वी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंतची फेरीबोट सेवा बंद होते. मेरीटाईम बोर्डाने १ सप्टेंबरपासून या मार्गावरील फेरीबोट सुरू करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार अजंठा, मालदार, पीएनपी या वाहतूक संस्थांनी आपल्या फेरीबोटी सज्ज ठेवल्या आहेत. मागील वर्षी घारापुरी बेटाकडे जाणाऱ्या एका प्रवासी बोटीला झालेल्या दुर्घटनेनंतर मेरीटाईम बोर्डाने प्रवासांच्या सुरक्षेसाठी काही कडक अटी घालून दिल्या आहेत. त्या अटींची पूर्तता आणि बोटींची दुरुस्ती करूनच यंदा
फेरीबोटी चालवण्यास अनुमती देण्यात येते. सध्या खराब असलेल्या हवामानामुळे ही खबरदारी घेतली जात आहे.
१ सप्टेंबरपासून गेटवे ते मांडवा फेरीबोट सुरू करण्यास मेरीटाईम बोर्डाने अनुमती दिलेली आहे. या दरम्यान हवामान शांत होणे गरजेचे आहे. सध्याची स्थिती पाहता फेरीबोट सेवा सुरू करणे प्रवाशांसाठी धोक्याचे होऊ शकते. भरतीची स्थिती पाहिल्यानंतर समुद्र किती खवळलेला आहे हे समजू शकते. त्याचबरोबर समुद्रात वाऱ्यांचा वेग आणि पडणाऱ्या मुसळधार पावसाचा अंदाज घेऊनच फेरीबोट सुरू केली जाईल.- आशिष मानकर, बंदर निरिक्षक-मांडवा
२६ मेपासून फेरी सेवा बंद
२६ मेपासून बंद करण्यात येणारी ही सेवा सप्टेंबर महिन्यात सुरू होणार होती. परंतु हवामान, अतिवृष्टी, खवळलेला समुद्र पाहता फेरी सेवा सोमवारी १ सप्टेंबरलाही सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या काळात रो-रो बोट सेवा सुरू होती. रो-रो बोट सेवा साधारण दिवसाला चार आणि रविवारी पाच फेऱ्या होणार असल्याने काही प्रमाणात प्रवासात दिलासा प्राप्त झाला. त्यामुळे तीन महिने प्रवाशांना जलवाहतुकीऐवजी रस्त्याचा पर्याय स्वीकारावा लागला होता. मांडवा येथून गेटवे जलमार्गावर पीएनपी, मालदार, अजिंठा, अपोलो या बोटी प्रवासी सेवा देतात. खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्याच्या कालावधीत जलमार्ग बंद ठेवण्यात आला आहे.