मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेले आंदोलन आज शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आझाद मैदात त्यांचे हे आंदोलन सुरू असून पावसाने मात्र जोरदार हजेरी लावली आहे. आधी या आंदोलनासाठी फक्त शुक्रवारीच परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ही परवानगी शनिवारसाठी वाढवण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळीच भाषण करताना आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली होती. पोलिसांकडे परवानगी वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, त्यांच्या आंदोलनास मुदतवाढ देण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनासाठी काही कडक नियम तसेच अटी पोलिसांकडून लादण्यात आल्या आहेत. या आंदोलनासाठी सरकारने संख्या मर्यादा ठरवली आहे. ही मर्यादा ५ हजारांच्या आत ठेवावी अशी अट घालण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सीएसएमटी परिसरात गर्दी केली होती. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगताना पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करत त्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांना सांभाळणे ही मुंबई पोलिसांसमोरची मोठी कसोटी ठरली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न केल्याचा आरोपही केला आहे.