रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. मंगेश पाटील नावाचा युवक जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली. NDRF चे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. माहितीनुसार, मंगेश पाटील आणि त्याच्यासोबत आणखी एक युवक नदीपत्रात उतरले होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही बुडू लागले. त्यापैकी दुसऱ्या तरुणाने कसाबसा पोहत किनारा गाठला. मात्र मंगेश पाटील हा युवक नदीच्या पाण्यात बुडाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचे अग्निशमन दल, खेड शहरातील 'विसर्जन कट्टा पथक' तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
दरम्यान, शिवसेना उपनेते व माजी आमदार संजय कदम यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. खेड तालुका प्रशासनानेही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यात खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनीही घटनास्थळी हजेरी लावून मदतकार्यात समन्वय साधला. विशेष म्हणजे, मंगेश पाटील हे भोस्ते पाटीलवाडीचे रहिवासी असून त्यांच्या घरी यंदाच पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. हा गणपती नवसाचा असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करत असतानाच ही घटना घडली आहे. सध्या मंगेश पाटील यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आहेत.