मुंबई : मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याची आग्रही मागणी मनोज जरांगे करत आहेत. ही मागणी पूर्ण करुन घेण्यासाठी जरांगेंनी हजारो समर्थकांसह मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेवर ताण येऊ नये म्हणून फक्त एक दिवस आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. पण जरांगे यांनी मुंबईत येताच आझाद मैदानावर बसून बेमुदत उपोषण करत असल्याचे जाहीर केले. ऐन गणेशोत्सवात जरांगे त्यांच्या हजारो समर्थकांसह मुंबईत आले आहेत. जरांगेंचे समर्थक विविध लहान - मोठी वाहनं घेऊन मुंबईत आले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी झाली आहे.
जरांगेंनी सकाळी १० वाजल्यापासूनच मुंबईच्या आझाद मैदानात बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. समर्थकांना पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईत आणलेली वाहनं पोलीस सांगतील त्या जागांवर पार्क करा, असेही जरांगेंनी समर्थकांना सांगितले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेले मनोज जरांगे पाटील यांना प्रशासनाने फक्त एकाच दिवसाची उपोषणाची परवानगी दिली आहे. न्यायालयाने यापूर्वी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, पोलिसांनी २० अटींच्या अधीन राहून उपोषण करण्याची मुभा दिली आहे. तरीदेखील जरांगे पाटील यांनी आपली ठाम भूमिका कायम ठेवत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही, हा माझा शब्द आहे.” प्रशासनाने दिलेली परवानगी फक्त आजपुरतीच मर्यादित असल्याने, पुढील काळात आंदोलनाचं रूप काय घेईल आणि जरांगे पाटील कोणती भूमिका घेतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे यांच्या समर्थकांना दहा महत्त्वाच्या सूचना
१. रस्त्यावर किंवा कुठेही गोंधळ घालू नका
२. दगडफेक, जाळपोळ करू नका,
३. मुंबईतले रस्ते मोकळे करा
४. पोलिसांना सहकार्य करा
५. पोलीस सांगतील तिथेच आपली वाहनं उभी करा.
६. सरकार सांगेल त्याच मैदानात झोपा, काहींनी वाशीला पोलीस सांगतील त्या मोकळ्या जागेवर जाऊन झोप घ्यावी
७. मुंबईकरांना त्रास देणं टाळा
८. जे फक्त मुंबईत सोडण्यासाठी आले होते त्यांनी परत जावं
९. आरक्षण हवंय तर फक्त त्याच्याशी संबंधित आंदोलन करुया, इतर भानगडी टाळा
१०. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही