Thursday, August 28, 2025

फूड प्रोसेसिंग-तंत्र, कौशल्य आणि व्यवस्थापन

फूड प्रोसेसिंग-तंत्र,  कौशल्य आणि व्यवस्थापन
सुरेश वांदिले

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे फूड प्रोसेसिंग(अन्नप्रकिया)उद्योग क्षेत्राच्या विकासाला नवी उर्जा मिळाली आहे. गेल्या काही वर्षात अन्नप्रकिया उत्पादन आणि निर्मिती घटकांमध्ये ३७ हजारावरुन ३९ हजार घटकांपर्यंत वाढ झाली. या क्षेत्रातील गुंतवणुकीची वाढ ३४ टक्के इतकी आहे. देशातील निर्यातीपैकी १३ टक्के वाटा या क्षेत्राचा आहे. देशातील प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन परदेशी कंपन्या व उद्योगसमूह अन्नप्रकिया उद्योगांमध्ये गुंतवणूक व व्यावसायिक सहकार्य करू लागले आहेत. करारपद्धतीची शेती, कच्चा मालाचा पुरवठा इत्यादीबाबींमध्ये ही गुंतवणूक वाढलेली दिसते. न्याहारीसाठी लागणारी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, विविध ऊर्जा पेये (एनर्जी ड्रिंक्स), स्नॅक्स, केक्स, आइस्क्रीम आणि पाळीव प्राण्यांचे अन्नपदार्थ यांची निर्मिती वाढली आहे. या उद्योगवाढीसाठी डिजिटल क्रांतीही उपयुक्त ठरली आहे. मोठ्या किराणा दुकानांच्या साखळी (रिटेल)मुळे अन्नप्रक्रिया उद्योगाच्या वाढीस हातभार लागला आहे.

या क्षेत्रातील करिअर संधी मिळवण्यासाठी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड मॅनेजमेंट (एनआयएफटीईएम), या संस्थेचे अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. ही संस्था केंद्रीय अन्न प्रकिया मंत्रालयाने, हरयाणातील कुंडली आणि तामिळनाडूतील तंजावूर येथे स्थापन केली आहे. अन्नप्रक्रिया उद्योगासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी जगातील सर्वोत्कृष्ट संस्था बनण्याचे उद्दिष्ट्य या संस्थेने ठेवले आहे. या दोन्ही संस्थांना, इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा देण्यात आला आहे.

अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन, या संस्थांनी अभ्यासक्रमाची संरचना केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पनांचा अधिकाधिक वापर उमेदवारांना करता यावा यासाठी अभ्यासक्रमात भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उत्तमोत्तम संधी मिळू लागल्या आहेत.

एनआयएफटीइएम - कुंडली

अभ्यासक्रम - बी. टेक इन फूड टेक्नालॉजी ॲण्ड मॅनेजमेंट - या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोन पद्धती अवलंबल्या जातात - (१) जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन - जेईई(मेन) या परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया, जॉईंट सिट ॲलोकेशन ॲथॉरिटी / सेंट्रल सिट ॲलोकशन बोर्डामार्फत राबविली जाते. या प्रक्रियेव्दारे १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. (संपर्क- csab.nc.in), (२) या संस्थेव्दारे थेट प्रवेश प्रकिया राबवली जाते, याव्दारे ५० विद्यार्थी जेइइ मेन, ३० विद्यार्थी सीयुइटी-युजी (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-अंडर ग्रज्युएट), २० विद्यार्थी नीट (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट)मधील गुणांवर निवडले जातात.

अर्हता - भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयासह १२ वीमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ६० टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या दोन घटकांचा समावेश असल्याने, विद्यार्थी संबंधित उद्योगक्षेत्रात कोणतीही तांत्रिक आणि व्यवस्थापकीय जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकतो.

करिअर संधी - हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी प्राप्त होतात - (१) प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सायंटिस्ट, (२) सेन्सरी सायंटिस्ट, (३) फूड मायक्रोबायलॉजिस्ट,(४) फूड अॅनॅलिस्ट, (५) क्वालिटी कंट्रोल मॅनेजर,(६) फूड प्रोसेसिंग इंजिनीअर, (७) फूड रेग्युलेटरी इंजिनीअर, (८) फूड रेग्युलेटरी अफेअर्स स्पेशॅलिस्ट, (९) न्युट्रिशन स्पेशॅलिस्ट,(११) सप्लाय चेन, कोल्ड चेन लॉजिस्टिक्स स्पेशॅलिस्ट,(१२) फूड फरर्मेंटेशन स्पेशॅलिस्ट,(१३) फूड प्रोसेसिंग सेक्टर - स्नॅक फूड, डेअरी फूड, वायनरी, शितपये, प्राण्यांचे मास, (१४) फूड सर्विस सेक्टर - हेल्‍थ ॲण्ड वेलनेस सर्विस प्रोव्हायडर्स, फूड रेग्युलेशन, फूड रिटेलिंग, सप्लाय चेन, पोस्ट हार्वेस्ट, (१५) व्यवस्थापक, (१६) तंत्रोव्यवस्थापक,(१७) सल्लागार, प्रवेश प्रकिया - दोन पद्धतीने प्रवेश दिला जातो. (१) ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनीअरिंग (गेट),(२) ज्या विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा दिली नसेल, अशा विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते.

Comments
Add Comment