Saturday, December 13, 2025

येणाऱ्या पालिका निवडणुकीत महाआघाडीचे तीन तेरा वाजणार : आशिष शेलार

येणाऱ्या पालिका निवडणुकीत महाआघाडीचे तीन तेरा वाजणार : आशिष शेलार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मुस्लिम महापौर करायचा आहे का ? विशिष्ट धर्माच्या विरोधात चाटुगिरी करणारे आता धार्मिक राजकारण करत आहेत. उद्धव ठाकरे यांची सेना आणि मनसे मुस्लिम मतांसाठी हातमिळवणी करत आहेत. हे दोन्ही पक्ष मतांसाठी कोणत्याही पातळीवर जाण्यास तयार आहेत.’त्यामुळे यांच्याबरोबरच येणाऱ्या पालिका निवडणुकीत महाआघाडीचे तीन तेरा वाजणार असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला.

तसेच देशाला अभिमान वाटावा असे जागतिक दर्जाचे वस्तूसंग्रहालय महाराष्ट्र सरकार बांद्रा येथील बीकेसीत उभारणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ही घोषणा केली.

यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले आणि अजय वैद्य व्यासपीठावर उपस्थित होते. मराठीचा अभिजात दर्जा आणि वारसा जोपासणार्या दिवाळी अंकांसाठी अनुदान देण्यात यावे अशी विनंती करणारे निवेदन शेलार यांना यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघ, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंच, ग्रंथाली, दिवा प्रतिष्ठान दिवाळी अंक प्रकाशक संघ यांच्या वतीने देण्यात आले.

या वार्तालापात महाविकास आघाडीतील पक्षांवर, विशेषतः उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर (मनसे) शेलार यांनी जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. भाजपाला मुंबईचा महापौर गुजराती करायचा आहे या मनेसेच्या टिकेचा समाचार घेताना शेलार म्हणाले, ‘राज ठाकरे यांना आता माझ्यात मित्रत्व दिसत नाही. ते स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी पुन्हा खोटे आरोप करत आहेत. मात्र जनतेला आता या नाटकांचा कंटाळा आला आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘आता महाराष्ट्रात महायुतीची सुनामी आहे. ही लाट एवढी प्रबळ आहे की आघाडीचे नेते गोंधळले आहेत. सत्ता गेल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आता पळापळ करत आहेत.’मुंबईकरांच्या पैशावर काही मोजके नेते सुखसोयी उपभोगत होते. आम्ही विकासासाठी काम करत आहोत, आणि हे लोक आरोपांच्या आड लपण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment