पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटीतून २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा आता ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाला आहे. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिवनेरीवर पोहोचताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजाच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न हा केवळ एका समाजाचा नसून न्याय आणि समानतेचा मुद्दा असल्याचे सांगितले. “समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळायलाच हवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रश्नात सकारात्मक भूमिका घ्यावी आणि समाजाला साथ द्यावी,” असे ते म्हणाले. तसेच, मुंबई गाठण्याचा निर्धार कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही मुंबईला जाणारचं. सरकारने आडमुठेपणा सोडून मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी,” असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला. शिवनेरीसारख्या ऐतिहासिक भूमीवरून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला नवी दिशा मिळत असून, पुढील काही दिवसांत आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. सर्व मृतांची ओळख ...
आरक्षणाच्या लढ्याला नवा जोर
“रायगड, शिवनेरी यांसारख्या गडकोटांमधून आम्हाला प्रेरणा मिळते. मराठा समाज प्रचंड वेदनांत आहे आणि या वेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतल्या पाहिजेत. समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला साथ दिली पाहिजे,” असे जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी फडणवीसांवर थेट प्रहार करत “मुख्यमंत्री कुणालाही थांबवणार नाहीत. न्यायालयाने जे सांगितले त्यानुसार आम्हीच पावले उचलली. न्यायदेवतेने परवानगी घ्या असे सांगितले आणि आम्ही घेतली. मात्र, फक्त एका दिवसाची परवानगी देणे म्हणजे समाजाची चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, मग परवानगी एक दिवसाची असो किंवा कायमची,” अशी टीका त्यांनी केली. सरकारने मुद्दाम मर्यादित परवानगी दिल्याचा आरोप करत जरांगे म्हणाले की, “जाणूनबुजून तुम्ही केवळ एका दिवसाचीच परवानगी दिली आहे. पण समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लढा आणखी तीव्र केला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. शिवनेरीवरून दिलेल्या या वक्तव्यामुळे मराठा आंदोलनाला नवा वेग मिळाला असून, पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“शिवनेरीच्या पायथ्याशी उभा राहून तुम्हाला शब्द देतो...”
मनोज जरांगे पाटलांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी उभं राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भावनिक आवाहन केलं. त्यांनी फडणवीसांना अद्याप संधी असल्याचं सांगत या संधीचं सोनं करण्याचं आवाहन केलं. “देवेंद्र फडणवीस, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. ही संधी वाया जाऊ देऊ नका. तुम्ही आमचे वैरी नाही, पण मराठाविरोधी भूमिका सोडा. मी इथं शिवनेरीच्या पायथ्याशी उभा राहून सांगतो – तुमच्याकडे योग्य संधी आहे. मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, आणि लक्षात ठेवा... हेच मराठे तुम्हाला मरेपर्यंत उपकार विसरणार नाहीत. हा माझा शब्द आहे,” असं जरांगे पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानाने आंदोलनाला भावनिक कलाटणी मिळाली असून, शिवनेरीवरून उच्चारलेला हा संदेश राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठरणार असल्याचं मानलं जात आहे.
मनोज जारण गे पाटील यांच्या मागण्या कोणत्या आहेत नेमक्या?
१. मराठा–कुणबी एकच असल्याची अंमलबजावणी
मराठा आणि कुणबी समाज हे एकच आहेत, हे शासनाने तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी. याशिवाय मुंबईतून मागे हटणार नाही, असा ठाम इशारा जरांगे पाटलांनी दिला.
२. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी
हैदराबाद गॅझेटियरचा अभ्यास मागील १३ महिन्यांपासून सुरू आहे, पण निर्णय होत नाही. सातारा व बॉम्बे गॅझेटियरप्रमाणेच हैदराबाद गॅझेटियरही तातडीने लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली.
३. ‘सगे–सोयरे’चा अध्यादेश स्पष्ट करावा
सगे–सोयरे संदर्भातील अध्यादेश निघून दीड वर्ष झालं, तरी अंमलबजावणीत ढिलाई आहे. ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून उपलब्ध आहेत, त्यांचे सगे–सोयरे ‘पोटजात’ म्हणून ग्राह्य धरावेत, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.
४. सरसकट गुन्हे मागे घ्यावेत
आंदोलनाच्या काळात मार खाऊन, त्रास सहन करूनही मराठा समाजावर गुन्हे दाखल झाले. हे सर्व गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबीयांची सरकारने जबाबदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
५. कायद्यात बसणारं आरक्षण
मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या टिकणारे, शाश्वत आरक्षण द्यावे. केवळ आश्वासनांवर समाजाला फसवू नये, असं जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं.