श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये गुरुवारी भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आणि दोन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना ठार केले.
गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जवानांनी मोहीम हाती घेतली. जवानांना बघताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
याआधी २ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले.
पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी हल्ला केला होता. या घटनेनंतर आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये सात चकमकींमध्ये २३ दहशतवादी ठार झाले. आज ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. इतर २१ दहशतवाद्यांपैकी बारा पाकिस्तानी नागरिक होते तर नऊ स्थानिक होते. या व्यतिरिक्त ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले.