चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण याबरोबरच टीम इंडियाच्या या अनुभवी गोलंदाजाने हे देखील स्पष्ट केले आहे की, तो जगभरातील विविध लीगमध्ये भाग घेणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आता IPL ला ही निरोप
अश्विनने १८ डिसेंबर २०२४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाब्बा कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले होते. तो आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. जिथे त्याने ९ सामन्यांमध्ये ७ विकेट घेतल्या आणि ३३ धावा केल्या. २०२५ मध्ये सीएसकेच्या संघर्षादरम्यान अश्विन इतर वादांमध्येही अडकला होता.
आर. अश्विनची आयपीएल कारकीर्द
३८ वर्षीय ऑफ-स्पिनर अश्विनने २२१ आयपीएल सामन्यांमध्ये १८७ विकेट्स घेतल्या आहे. त्याचा इकॉनॉमी रेट ७.२० होता. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ४/३४ अशी आहे. याशिवाय, त्याने ९८ डावांमध्ये ८३३ धावा केल्या. त्यांची सर्वाधिक धावसंख्या ५० अशी होती. अश्विन इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ५ संघांसाठी खेळला आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. तसेच त्याने या लीगमध्ये पंजाबचे नेतृत्वदेखील केले होते.
अश्विनने सोशल मिडियावर शेअर केली निवृत्ती पोस्ट
अश्विनने त्याच्या निवृत्ती पोस्टमध्ये लिहिले - "आज माझ्यासाठी एक खास दिवस आहे आणि म्हणूनच एक नवीन सुरुवात देखील आहे, असे म्हटले जाते की प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात घेऊन येतो, माझी आयपीएल कारकीर्द आता संपत आहे, परंतु जगभरातील वेगवेगळ्या लीगमध्ये नवीन क्रीडा अनुभवांचा माझा प्रवास आजपासून सुरू होतो. मला संस्मरणीय अनुभव आणि संधी देणाऱ्या सर्व फ्रँचायझींचा मी आभारी आहे. सर्वात जास्त @IPL आणि @BCCI चे आभार, ज्यांनी आतापर्यंत मला खूप काही दिले आहे. येणाऱ्या काळाचा आनंद घेण्यासाठी मी उत्सुक आहे.'