रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज रत्नागिरी शहराजवळील नाचणे येथे राहणारा अनिकेत शशिकांत तेली (वय २३ वर्षे) याने सकाळी आपल्या आईचा सुरीने गळा कापला आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने हातांच्या दोन्ही नसा सुरीने कापल्या असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. तातडीने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
अनिकेत पुण्याला नोकरीला होता. त्याने आईला का मारले, याचा तपास पोलीस करत असून स्वतः तोही गंभीर जखमी असल्याने पोलिसांना अधिक माहिती मिळू शकली नाही. कौटुंबिक वाद किंवा अन्य काही कारणामुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.