नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मंगळवारी(दि.२६) माहिती दिली की, पंतप्रधान मोदींचा हा दोन दिवसांचा जपान दौरा हिंद-प्रशांत क्षेत्रात आणि त्यापलीकडेही शांतता, समृद्धी आणि स्थैर्य याविषयी दोन्ही देशांच्या कटिबद्धतेची पुन्हा पुष्टी करेल. या दौऱ्यामुळे भारत-जपान मैत्री आणखी मजबूत होईल आणि नवीन सहकार्याच्या दिशा खुल्या होतील.
या दौऱ्याबाबत भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती देताना सांगितले की, “ पंतप्रधान मोदी 28 ऑगस्टच्या संध्याकाळी जपानच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. ते जपानचे पंतप्रधान महामहिम शिगेरु इशिबा यांच्यासोबत 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतील.
भारत आणि जपान यांच्यातील संबंधांमध्ये संरक्षण व सुरक्षेवरील सहकार्य हे अलीकडच्या काळात एक मजबूत स्तंभ म्हणून उभे राहिले आहे.” या वर्षी दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांचीही बैठक झाली होती, ज्यामध्ये संयुक्त ऑपरेशन्स, संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान भागीदारी यावर महत्त्वाची चर्चा झाली.
विक्रम मिस्री म्हणाले, “दोन्ही देश एकत्र येऊन ‘युनिफाइड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना’ (युनिकॉर्न) चे सह-निर्माण करत आहेत. या युनिकॉर्न प्रकल्पावर नोव्हेंबर 2024 मध्ये सह्या झाल्या होत्या. भारतीय नौदल आणि जपानी नौदल भारतात जहाज दुरुस्तीच्या क्षेत्रात सहकार्याच्या शक्यता शोधत आहेत. इसरो आणि जपानची अंतराळ संस्था चंद्रावर संशोधन मोहिमेसाठी एकत्र काम करत आहेत. ही मोहीम चंद्रयान-5 मिशनसोबतच पुढे नेली जात आहे.”
पुढे मिस्री म्हणाले, “या दौऱ्यात अनेक द्विपक्षीय बैठकांचे आयोजन केले जाईल. सध्या त्या बैठकींना अंतिम रूप दिले जात आहे आणि आम्ही तुम्हाला यासंदर्भात वेळोवेळी माहिती देत राहू. बैठकींपूर्वीच काय चर्चा होईल आणि काय नाही याचा अंदाज बांधणे ही घाई होईल.”
‘क्वाड’ विषयी बोलताना परराष्ट्र सचिव म्हणाले,“क्वाड हा खरंतर हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थिरता, समृद्धी आणि विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मंच आहे. अलीकडच्या काळात याचे अजेंडे वैवहारिक सहकार्याच्या मुद्द्यांपर्यंत विस्तारले आहेत. जसे की आरोग्य सुरक्षा, महत्त्वाच्या आणि नवोदय तंत्रज्ञानांचा समावेश.”
“अलिकडेच महत्त्वाचे खनिज, पुरवठा साखळी अधिक लवचिक बनवणे, आणि पायाभूत सुविधांचा विकास यावरही चर्चा झाली आहे. हे सर्व मुद्दे भारत आणि जपानसाठी अत्यंत प्राधान्याचे आहेत. दोन्ही देश या मंचाला आणि भागीदारीला फार मोठे महत्त्व देतात. आम्ही आमचे सहकार्य वाढवण्यासाठी सर्व क्वाड भागीदारांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत. मला खात्री आहे की जेव्हा दोन्ही पंतप्रधान भेटतील, तेव्हा ‘क्वाड’ हे एक महत्त्वाचे विषय असेल, ज्यावर चर्चा होईल.”
विक्रम मिस्री म्हणाले, “ही यात्रा अनेक कारणांनी महत्त्वाची आहे. ही मोदींची पंतप्रधान इशिबा यांच्यासोबत पहिली वार्षिक शिखर बैठक आहे. तसेच ही त्यांची जवळपास सात वर्षांनंतरची पहिली स्वतंत्र जपान यात्रा आहे. त्यांनी शेवटचे 2018 मध्ये वार्षिक परिषदेसाठी जपानला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी इतर बहुपक्षीय कार्यक्रमांसाठी जपानला भेट दिली होती, पण ही यात्रा पूर्णपणे भारत-जपान द्विपक्षीय संबंधांवर केंद्रित असेल. 2014 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर मोदींची ही जपानमधील आठवी भेट असेल. यावरून आपल्या परराष्ट्र धोरणात या संबंधांना किती महत्त्व आहे, हे दिसून येते.
पंतप्रधान मोदींच्या चीन दौर्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) तन्मय लाल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी चीनच्या तिआनजिन शहरात होणाऱ्या ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एससीओ) च्या राष्ट्रप्रमुख परिषदेसाठी दौरा करतील.”
एससीओ मध्ये एकूण 10 सदस्य देश आहेत. भारताशिवाय यामध्ये बेलारूस, चीन, इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. तिआनजिनमध्ये होणाऱ्या 25व्या एससीओ शिखर परिषदेच्या कार्यक्रमात, 31 ऑगस्टच्या संध्याकाळी एक स्वागत समारंभ आयोजित केला जाईल. तर मुख्य शिखर परिषद सोमवार, 1 सप्टेंबर रोजी पार पडेल. तन्मय लाल म्हणाले की, “ एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी काही द्विपक्षीय बैठकाही घेतील, अशी अपेक्षा आहे.”