मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने पहिले पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे हे मंगळवारी सकाळी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत पोहोचले आहेत.
राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत पुढील 10 दिवस हे गणेशोत्सवाच्या असून या काळात मराठा मोर्चा मुंबईत आल्यास पेचप्रसंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
ही परिस्थिती लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी स्वत:हून एक पाऊल पुढे टाकले आहे. मनोज जरांगे मोर्चा ठरलेल्या तारखेला काढण्यावर ठाम आहेत. ओएसडींची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची काहीच चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मी मोर्चावर ठाम आहे, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. माझ्या लेकराबाळांच्या आयुष्य़ाचा प्रश्न आहे. चर्चा नाही, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.