मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण
मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी राहिला आहे, त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती आता मंडपात सज्ज झालेले पाहायला मिळत आहे. मुंबईतील मानाच्या गणपतीचे मुखदर्शन देखील भाविकांनी घेतले आहे. या दरम्यानच, आज मुंबईतील सर्वात श्रीमंत असलेल्या किंग सर्कलच्या गणरायाची पहिली झलकही भाविकांना पाहायला मिळाली.
आज संध्याकाळी वडाळ्यातील किंग सर्कल येथील जीएसबी मंडळात सोन्या चांदीने मढवलेल्या, गणपती बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांनी मंडपात मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. बाप्पाच्या मुखदर्शनासाठी जसा पडदा उघडला गेला, गणेश भक्तांचा जयघोष सुरू झाला. मुंबईचा सर्वात श्रीमंत गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या जीएसबी मंडळाच्या या गणरायाचे विलोभनीय रूप पाहून गणेशभक्त मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले.
मुंबईतील आकर्षणाचा केंद्रबिंदू
मुंबईतील आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि भारतातील सर्वात श्रीमंत गणपतीची मूर्ती म्हणून मुंबईतील जीएसबीचा गणपती ओळखला जातो. याचे कारण म्हणजे हा गणपती नखशिखांत सोने आणि चांदीने मढलेला असतो. त्याचे सिंहासन तसेच आभूषणांची किंमत कोटींच्या घरात असते. जीएसबीच्या गणपतीला ६६ किलो पेक्षा अधिक सोनं आणि ३०० किलो पेक्षा अधिक चांदीचे दागिने घालण्यात येतात. जीएसबी गणपतीची मूर्ती ही पर्यावरणपूरक असून ती चिकणमाती, गवत आणि नैसर्गिकरित्या पाण्याच्या रंगानी बनवण्यात येते, तसेच या गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशी अगदी पारंपरिक पद्धतीने केले जात असल्यामुळे, दरवर्षी जीएसबीच्या गणपतीची चर्चा ही होतेच होते!