मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी आणि रविवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांच्या खाजगी तसेच सार्वजनिक वाहनांची एकच गर्दी महामार्गावर एकवटली असल्यामुळे, दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे. वाहन काही किलो मीटर पुढे सरकायला देखील तासभर लागत असल्यामुळे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्न तर करीत आहे, पण यात त्यांची देखील दमछाक झालेली पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सव सन हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण मानला जातो. या काळात मुंबईकर आपापल्या गावी प्रस्थान करतात, इतकेच नव्हे तर मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतींचे मुखदर्शन करण्यासाठी राज्यातून गणेश भक्त मुंबईत येतात. त्यामुळे या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान वाहतूक प्रशासनावर येते. यावर्षी देखील सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. खास करून, रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे, लवेल, आवाशी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
यावर्षी गणेश चतुरती बुधवारी, दिनांक २७ ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे मुंबईतील कोकणवासीयांनी आपापल्या गावी रवाना होण्यासाठी शनिवार आणि रविवारचा दिवस निवडला. याचमुळे काल आणि आज महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गासोबतच इतर पर्यायी रस्त्यांवरही मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळं कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाटांवर कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे भरपूर हाल होत आहे. हीच परिस्थिती आणखीन दोन दिवस मुंबई गोवा महामार्ग तसेच कोकणात जाणाऱ्या इतर पर्यायी मार्गावर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.