पालकमंत्री नितेश राणे यांचा अवैध व्यावसायिक आणि प्रशासनाला थेट इशारा
कणकवली : सिंधुदुर्गातील युवकांच्या भविष्याशी खेळणारे, अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या मटका-जुगार, ड्रग्स, दारू, अशा अवैध व्यवसायांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी थारा देणार नाही. प्रशासनाने अवैध धंदे बंद केले नाहीत तर मी स्वतः धाड टाकीन. प्रशासनातील सर्वच अधिकारी वाईट नाहीत. अनेक अधिकारी प्रामाणिक आणि चांगले काम करत आहेत. मात्र जिल्ह्यातील अवैध धंद्यांना जे पोलीस-महसूल अधिकारी पाठीशी घालत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई होईल. माझ्या जिल्ह्याच्या भविष्याशी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा बंदरे, मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
प्रहार भवन येथे शुक्रवारी मंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्यांना खरमरीत इशारा देणारी पत्रकार परिषद घेतली. पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, १८ जानेवारी २०२५ रोजी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हापासून सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणेसोबत झालेल्या प्रत्येक बैठकीत आदेश दिले होते की, मी पालकमंत्री असताना सिंधुदुर्गात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालता कामा नयेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेला डाग लागेल, असा कोणताही प्रकार घडणार नाही, याची जिल्हा पोलीस यंत्रणेने दक्षता घ्यावी असे स्पष्ट सांगितले होते. नारायण राणे यांनी स्वतः जत्रेत सुरू असलेले जुगार आणि अवैध धंदे बंद केले होते.
त्याच राणे यांचा मी मुलगा आहे. राणे साहेबांच्या विचारसरणीवर चालणारा मी कार्यकर्ता आहे. याआधी दोन वेळा मी पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंदे, कुठे चालतात? कोण चालवतो? कोणता ऑफिसर, कर्मचारी त्यांना सपोर्ट करतो, याची माहिती दिली होती. मी स्वतः पोलिसांना टीप दिली आहे आणि त्यांनतर पोलिसांनी रेड टाकली होती. मी ९ महिने पोलिसांना वेळ दिला. तरीही अवैध धंदे सुरूच होते. म्हणूनच मी कणकवलीत मटका बुकी अड्ड्यावर धाड टाकली. कालच्या घटनेमुळे मी काय करू शकतो, हे समजले असेल, असे मंत्री राणे यावेळी म्हणाले.
सिंधुदुर्गातील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, पोलीस खाते, महसूल आणि इतर विभाग काय काय करतात. वाळू चोरी, गांजा, गोवा बनावटीची दारू यांना कोण पाठबळ देत आहे, हे सर्व माहिती आहे. मी सगळ्यांना कारवाईसाठी वेळ दिला आहे. त्यांनी त्यांनी त्या त्या प्रकारची कारवाई करावी. जर कोणी अशा अवैध धंद्यांना पाठबळ दिले आणि त्यात जर कोणी सस्पेंड झाला तर मला दोष देऊ नका, असा स्पष्ट इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे.
अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सस्पेंड करणार
कणकवलीतील मटका, जुगार अड्ड्यांवर आम्ही धाड टाकली. आता अवैध दारू धंदे, अंमली पदार्थांचे अड्डे, वाळू माफिया यांच्यावर कारवाईचा नंबर आहे. सर्व अवैध धंदे बंद न झाल्यास आम्ही दर आठवड्याला धाडसत्राची ब्रेकिंग न्यूज देणार आहोत. तसेच या अवैध धंद्यांना पाठबळ देणारे पोलीस अधिकारी असो, महसूल अधिकारी असो किंवा अन्य शासकीय कर्मचारी या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही सस्पेंड करणार आहोत. त्यामुळे अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे, असा इशारा पालकमंत्री नितेश राणे
यांनी दिला.
कणकवलीत टाकलेली धाड हा तर ट्रेलर
यापुढे जर कोणी अवैध धंद्यांना पाठबळ देत असेल तर हयगय करणार नाही. गांजा कुठून येतो, कोण विकतो हे पोलिसांना माहिती आहे. वाळू चोरी कशी होते? वाळूचे रॅम्प कसे उभारतात हे मला माहिती आहे. कणकवलीत टाकलेली धाड हा ट्रेलर होता. गोव्यातून येणारी अवैध दारू कशी येते, कुठे उतरते हे सगळे मला माहिती आहे. अवैध दारूवाल्यांशी कोणत्या पोलिसांचे लागेबांधे आहेत ते मला माहीत आहे. त्यामुळे माझ्या नादी लागू नका. मटका, जुगार, ड्रग्स, यांच्यासह वाळू माफियांच्या संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी हा इशारा समजावा. यापुढे वाळूचोरी सहन करणार नाही. माझ्या जिल्ह्याच्या भविष्याशी खेळणाऱ्यांविरोधात मी उभा आहे,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.