आईपणाचा सोहळा

आसावरी जोशी : मनभावन


ती आरडओरडा करते. आक्रस्ताळेपणाने थयथयाट करते. तिचे ऐकले नाही की...! आई कशी असते? प्रेमळ, सोशिक, त्यागी, त्याच्याच जोडीने अगदी धटिंगणसुद्धा. जरा वावगा वाटला न शब्द वाचायला... प्रत्येकाने आपल्या आईचे प्रत्येक रूप जरा आठवून पाहावे. सहज स्फुरेल हा शब्द तुम्हालासुद्धा. भाजीवाल्याशी, वाण्याशी तिचे हिशेब अगदी चोख असतात. जराही गणितात चुकणार नाही. पण आपल्याला जेवायला वाढायला, आपला रोजचा डबा भरून देताना बहुदा ती गणितच विसरते. एका पोळीच्या रोलच्या जागी तीन पोळ्यांचे रोल्स असतात. भात अगदी भरपूर कालवलेला असतो. वरून तुपाची धार सोडून...


पिठोरी अमावस्या... अर्थात आपला मातृदिन... काल झाला असला तरी आजच्या लांबलेल्या अमावस्येचा फायदा घेऊन मी आजही मातृदिन साजरा करते आहे तुमच्या समवेत... कारण हा आईपणाचा सोहळा कधीही साजरा करावा... मातृदिनाच्या दिवशी आई आपल्या बाळांना वाण देते. त्यांच्यासाठी खीर पुरीचा नैवेद्य करते.


आई... असे म्हणतात, देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने माय निर्मिली. पण खुद्द देवालाही आईच्या या बहुरंगी मायेची भुरळ पडलेली आहे, म्हणूनच अगदी हौसेने मनुष्य जन्म घेऊन त्याने हे आईच्या पदरातील पोर असण्याचे सुख अगदी मन:पूत अनुभवले आहे. तो यशोदाआईचा कान्हा आहे. देवकीचा पान्हा आहे. स्वयंसिद्धा गौराईचा बाळ आहे. आदिमायेने तर आपले स्वत्व आणि विज्ञानत्व अगदी सहज सिद्ध केले आहे. आपल्या त्वचेच्या पेशीपासून गणेशाला जन्म देऊन... तो दहा दिवसांचा पाहुणा होऊन पृथ्वीतलावर अवतरतो आणि त्याच्या ओढीने तीही माहेरवाशीण म्हणून आपला पाहुणचार अगदी आवडीने स्वीकारते. प्रत्येक घराशी तादात्म्य घेऊन, त्या घरातील रीती परंपरांचा मान राखून, पण खरे कारण आहे की लेकाशिवाय तिला करमतच नाही. बहुतांश घरातून त्याला कडेवर घेऊनच प्रस्थान करते ती हिमवानाकडे. हे झाले देवाचे पोरपण अनुभवणे. याखेरीज अत्यंत हौसेने तो साऱ्या जगाचे आईपण मिरवतो आहे. एका विटेवर युगानुयुगे उभा राहून, मिटल्या डोळ्यांनी, स्वत:ला माउली म्हणवून घेत...


आई होणे हाच एक मोठा सोहळा असतो. अगदी त्या दोघांपुरताच, म्हणजे आई आणि तिच्या बाळापुरता. खूप खूप खासगी असा आनंदसोहळा. ते दोघेही एकमेकांना जन्म देत असतात आणि खरेच सांगते तो अत्यंत मौल्यवान क्षण फक्त आणि फक्त त्या दोघांचा असतो. तिचे स्वत:चे बाळ... कोणत्याही चौकटीत मावू शकत नाही हे नाते. जेव्हा तिचे बाळ तिच्याकडे येते तेव्हा ती फक्त आई असते. काहींची बाळे आईच्या मनातून उमललेली असतात. अगदी निष्पाप फुलागत, या बाळांशी तर तिचे नाते खूपच वेगळे असते. अगदी दैवी. कारण ही सगळी बाळे देवाच्या घरून उमललेली असतात तिच्या मनात... त्यांना देव कोणत्याही रूपात पाठवतो... फक्त एकमेकांची ओळख एकमेकांना उमगायला हवी... मग ते जग केवळ त्या दोघांचे असते.. सुंदर... छान... अत्यंत पवित्र... खूप गंमत जंमत असते... या दोघांच्याच जगात... खाऊ असतो. गप्पा असतात. हितगुज असतं. मनीचे सूर असतात.


लोभस रुसवे असतात. क्षणात विरून जाणारी भांडणे असतात. धम्मक लाडू, चापट पोळी सारे सारे असते. आईची वाट पाहणे असते. बाळाची साथ असते. सायीचा हात असतो. फक्त तो सायीचा स्पर्श जाणवायला हवा मनाला. माझ्या प्रिन्स आणि चीकूमुळे हा आईपणाचा सोहळा मी रोजच्यारोज साजरा करते. “being a Pug and Turtle’s Mother is everyday Romance with life!”


जशी ओढ आईला लेकाची असते. तशी लेकरांनाही आईची असते. आई हवीच असते. मनातले बोलायला, हक्काने रुसायला, भरपूर लाड करून घ्यायला, चुकले की कुशीत शिरायला, हे असे एकच ठिकाण असते, जिथे माफी न मागताच मिळते. एका चित्रपटात खूप तरल संवाद आहे, आई मुलामधला... स्मृतीभ्रंश झाल्याने आई आपल्या मुलाला ओळखत नसते. पण ओढ मात्र केवळ मुलांचीच असते. स्वत:च्याच मुलाला ती सांगते... “मेरे बच्चे बहुत छोटे है. इतने छोटे बच्चे माँ के बगैर रह नहीं सकते...” त्यावर मुलगा इतके छान उत्तर देतो... “ किसी भी उमर के बच्चे माँ के सिवा रह नहीं सकते...”

Comments
Add Comment

मी आणि ‘घासीराम कोतवाल’

भालचंद्र कुबल : पाचवा वेद घासीराम पुराण इतक्या लवकर आवरतं घेता येईल असं काही वाटत नाही. पण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

झेंडे प्लॅटर...!

आसावरी जोशी : मनभावन आपला देश, महाराष्ट्र, मुंबई ... या तिन्हींशी निगडित प्रत्येक चांगली गोष्ट आमच्या घरासाठी

ती आई होती म्हणून...

पितृपक्षाला प्रारंभ झाला की, सर्वांना आपापल्या पूर्वजांची आवर्जून आठवण येते. हे स्वाभाविकच असले, तरी आपल्या

कोकणच्या मातीची मिठ्ठास भ्रमंती...

राजरंग : राज चिंचणकर कोकणचा प्रदेश, तिथला निसर्ग, तिथली माणसे या सगळ्यांत गोडवा ठासून भरलेला आहे. अशा प्रकारची

मी आणि घासीराम कोतवाल

भालचंद्र कुबल : पाचवा वेद घासीराम नव्याने उभे करायचे म्हणजे नेमके काय करायचे याबाबत माझ्या डोक्यात काही

पुढच्या वर्षी लवकर या!

आसावरी जोशी : मनभावन श्यामची आई पुस्तकात आईच्या तोंडी एक वाक्य आहे. अगदी सहज मनास भिडणारे. देवाच्या घरून येणारे