पुणे : राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिवसेंदिवस वाढत असून, पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते. गणेशोत्सव काळात गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लोक शहरात फिरतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महामेट्रोच्या माहितीनुसार, पुण्यातील मेट्रो सेवा गणेशोत्सवाच्या काळात पहाटे २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याशिवाय, विसर्जनाच्या दिवशी पुणे मेट्रो सलग तब्बल ४१ तास धावणार आहे. त्यामुळे रात्री उशिरा देखावे पाहून परतणाऱ्या प्रवाशांना मेट्रोची सोय उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांसोबतच बाहेरून आलेल्या भाविकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत तर होईलच, पण सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने हा निर्णय स्वागतार्ह ठरत आहे.
वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या व्हिसा आणि इमिग्रेशन रेकॉर्डची व्यापक ...
पहाटे २ वाजेपर्यंत सुरु राहणार सेवा
पुण्यातील गणेशोत्सव हा राज्यभर प्रसिद्ध असून मानाचे गणपती आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच राज्याबाहेरूनही भाविक पुण्यात येतात. या गर्दीचा विचार करून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने यंदा खास नियोजन केले आहे. यावर्षी पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या मार्गावरील कसबा, मंडई आणि स्वारगेट ही महत्त्वाची स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व स्थानके मानाच्या गणपती मंडळांच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे भाविकांना गर्दीतून मार्ग काढण्याऐवजी मेट्रोने थेट देखावे पाहण्यासाठी जाता येणार आहे. गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे या काळात मेट्रो सेवा पहाटे दोनपर्यंत सुरू राहणार आहे. फेऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडई स्थानकात एका बाजूने प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची सोय करण्यात आली आहे. महामेट्रोकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, गर्दी टाळण्यासाठी आणि सोयीस्कर प्रवासासाठी मेट्रो सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
कशी असणार वेळ?
विशेषतः अनंत चतुर्दशीच्या दिवशी (६ सप्टेंबर) मेट्रो सेवा सकाळी ६ वाजता सुरू होऊन थेट दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल ४१ तास अखंड सुरू राहणार आहे. याशिवाय, गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत म्हणजे २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान मेट्रो सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील. पुढे ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात मेट्रो सेवा भाविकांच्या सोयीसाठी सकाळी ६ पासून पहाटे २ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे उशिरापर्यंत गणेशमंडळांचे देखावे पाहणाऱ्या भाविकांना मोठी सोय होणार असून गर्दीही काही प्रमाणात कमी होईल. पुणेकरांना या सेवेमुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.