छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगरमधील न्यू शांतीनिकेतन कॉलनी येथे बुधवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. आई व बहीण मामासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनाला गेलेल्या असताना घरात एकटाच राहिलेल्या २० वर्षीय तरुणाने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्याने आणखी धक्कादायक पाऊल उचलले. तरुणाने घरातील गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट घडवून आणला. या भीषण स्फोटामुळे घरात आग लागली आणि तरुण ज्वाळांमध्ये सापडला. भाजल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून तरुणाने एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सीए होण्याचे स्वप्न अधुरेच
मृत तरुणाचे नाव ओम संजय राठोड (वय २०, रा. बंबाट नगर) असे असून तो अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. भविष्यात सीए होण्याचे त्याचे स्वप्न होते. ओमने दहावी परीक्षेत तब्बल ९३ टक्के गुण मिळवत उत्तुंग यश मिळवले होते. त्यानंतर तो सातत्याने अभ्यास करत सीएच्या शिक्षणाची तयारी करीत होता. कुटुंबासोबत तो बंबाट नगरमध्ये राहत असला तरी महाविद्यालय लांब असल्याने तो अधूनमधून जवाहर नगर भागातील आपल्या काकांच्या घरी राहत असे. घटनाकाळी ओमचे वडील घरीच होते, तर आई आणि बहीण काही दिवसांपूर्वी मामासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाल्या होत्या. बुधवारी दुपारी वडिलांसोबत घरातून बाहेर पडलेला ओम अचानक “चार्जर महाविद्यालयात विसरलो” असे सांगून थेट काकांच्या घरी पोहोचला. तेथे तो नेहमीप्रमाणे काकूंशी गप्पा मारत होता. मात्र त्यावेळी तो तणावाखाली आहे, अशी कोणतीही चिन्हे कुटुंबीयांना जाणवली नाहीत.
छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या (Naxalite Attack) अमानुष कृत्यामुळे पुन्हा एकदा भीती आणि संतापाची लाट उसळली आहे. कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा गावात ...
वडिलांसोबत “काळजी घ्या बाबा” असा शेवटचा संवाद
२० वर्षीय ओम संजय राठोड या तरुणाने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेत गॅस सिलेंडरचा स्फोट घडवून आणला. यात तो गंभीर भाजला गेला आणि उपचारादरम्यान मृत्यू पावला. दरम्यान, मृत्यूपूर्वी ओमने वडिलांशी शेवटचा संवाद साधत “जेवण केले का? काळजी घ्या” असे सांगून फोन ठेवला होता. काही वेळाने काकू शाळेत मुलाला आणण्यासाठी बाहेर गेल्या. परत आल्यानंतर त्यांनी ओमला हाक मारली, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शंका आल्याने त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. तेवढ्यात घरातून मोठा आवाज झाला आणि गॅस सिलेंडरचा प्रचंड स्फोट झाला. आवाज ऐकून नागरिक धावून गेले असता स्वयंपाकघरात ओम पेटलेल्या अवस्थेत दिसून आला. शेजाऱ्यांनी तातडीने बेडशीट टाकून अंगावरील ज्वाळा विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु ओम गंभीर भाजला. तातडीने घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अग्निशामक विभागाचे अधिकारी विजय राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. प्राथमिक तपासात असे उघड झाले की, ओमने जाणीवपूर्वक गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर काढून गॅस लीक होण्यासाठी कात्री अडकवली होती. या आगीत घराचे दरवाजे, खिडक्या आणि किचनमधील साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. ही आग वेळेत विझवली नसती, तर मोठा स्फोट होऊन आसपासच्या घरांनाही मोठे नुकसान झाले असते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.