कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने ‘साई’ ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन


पुणे : कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेतही यशस्वी होण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे. त्यासाठी हे ज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहोचविणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आवश्यता आहे. सिंम्बायोसिसने यासाठी योग्य वेळी पुढाकार घेतला असून या प्रयत्नात ‘साई’  ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवळे येथे सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटच्या (एसएआयआय- साई) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, यावेळी सिम्बायोसिसच्या प्रधान संचालक तथा सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, एसएआयआयच्या संचालक प्रा. डॉ. लवलीन गौर आदी उपस्थित होते.


कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जाणून घेत या क्रांतीत आघाडी घेण्याची ही योग्य वेळ आहे असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात उपयोग करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग होणार असून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल. पुण्यात झालेल्या ॲग्री हॅकेथॉनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपयुक्त तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले.


राज्य शासनाने एआय चॅटबॉट्स तयार केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना कळेल त्या भाषेत शंकाचे समाधान होऊ शकेल. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पुण्यातील वाहतूक विषयक अडचणींवर उपाययोजना सुचविण्यासाठी गुगलशी करार केला आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनासाठी आवश्यक माहिती तात्काळ मिळू शकणार आहे. मानवाचे जीवन सुकर करण्यासाठी बहुविध पद्धतीने हे तंत्रज्ञान उपयोगात आणता येऊ शकते. राज्य शासनाने मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित ३ संस्थांची सुरूवात केली आहे. कायदा व सुव्यवस्था, प्रशासन, कृषी, तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रात या संस्था काम करणार असून त्यासोबतच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मुलभूत ज्ञानाबाबत नागरिकांना याद्वारे प्रशिक्षित करण्यात येईल.


कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक उपयोग गरजेचा


सध्याच्या युगात कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वाँटम कंम्प्युटिंग आणि सेमी कंडक्टर या गोष्टींमुळे मोठे बदल घडून येत आहेत. अशा तंत्रज्ञानाच्या आव्हानांचा क्षमतेने उपयोग करून घेतल्यास प्रगतीचा वेग आणि कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतात. म्हणून अनुकूल विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला स्वीकारणे ही आजची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे डिजीटल आर्थिक फसवणुकीची प्रकरणेही समोर येत आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार आणि सकारात्मक वापर करणे गरजेचे आहे. दुर्गम भागातील आरोग्य सेवेसाठी आणि औषध निर्मितीत एआयचा उपयोग याचेच एक उदाहरण आहे.


इंटरनेट क्रांतीप्रमाणे ‘एआय क्रांती’तही आघाडी घ्या


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसाराने समाजासमोर येणाऱ्या आव्हानांची चर्चा सुरू झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा रोजगारावर होणाऱ्या परिणामाविषयी विशेषत्वाने प्रश्न उपस्थित केले जातात. नव्वदीच्या दशकात इंटरनेट आणि संगणक क्रांतीच्या संदर्भातही अशीच शंका उपस्थित करण्यात आली होती, मात्र देशाने या क्रांतीचे संधीत रुपांतर करून भारतीयांनी जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आज एआय क्षेत्राचे ज्ञान सामान्य जनांपर्यंत पोहोचवून या क्षेत्रातही आघाडी घेण्याची संधी आपल्याला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सिम्बायोसिस संस्थेने त्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचेही ते म्हणाले.


डॉ. मुजुमदार म्हणाले, कला, वाणिज्य, विज्ञान ज्ञानशाखांतील विद्यार्थ्यांसाठी पदवीस्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक शिक्षण देणारी संस्था नसल्याचे ओळखून राज्यात प्रथमच अशा स्वरुपाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. येथे बी.बी.ए. इन एआय आणि बी.एस.सी. इन एआय हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मानवी विकासाच्या चौथ्या क्रांतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका महत्त्वाची आहे. आता भविष्यात तंत्रज्ञानासोबतच आध्यात्मिक मूल्यांवर आधारित क्रांतीचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


स्वागतपर भाषणात डॉ. येरवडेकर म्हणाल्या, सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटची स्थापना अभियांत्रिकी शाखा विरहित कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे. येथे सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून पहिल्याच वर्षी १९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पुढील काळात नागपूर येथेही अशी संस्था सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सिम्बायोसिसच्या ‘साई’ (SAII) या बहुभाषिक व्हर्चुअल असिस्टंटचे लोकार्पण करण्यात आले. डॉ. रामकृष्णन रमण यांनी या बहुभाषिक व्हर्चुअल असिस्टंटबाबत माहिती दिली. प्रारंभी सिम्बॉयसिसच्या वाटचालीबाबत लघुचित्रफीत दर्शविण्यात आली.


यावेळी विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे