मुंबई: चेंबूर ते भक्तीपार्कदरम्यान बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांची थरारकपणे सुटका केली जात आहे. काही तांत्रिक कारणामुळे तब्बल दोन तासांहून अधिक काळ मोनोरेल अडकून पडली. बंद पडलेल्या मोनोमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना त्रास होऊ लागला.
क्रेनच्या सहाय्याने या प्रवाशांची सुटका केली जात आहे. तरी आणखी काही काळ सुटकेसाठी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला आधी प्राधान्य द्या अशा प्रकारच्या सूचना मु्ख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. सर्वांनी संयम ठेवावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. मी एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. हा प्रकार का घडला, याचीही चौकशी करण्यात येईल. असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोनोरेलमधील प्रवाशांना सरळ संपर्क साधत काळजी करू नका असे सांगितले. आम्ही सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. तुम्हाला काहीच होणार नाही अशी ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.