धरणक्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने मुखेड तालुक्यातील सहा गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. मुखेड तालुक्यात फारसा पाऊस झालेला नाही. मात्र, तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या उद्गीर येथील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. रविवारी रात्री गावकरी झोपल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास उद्गीर भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे लेंडी नदीला पूर आला. मुखेड तालुक्यातील भेंडेगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी ही सहा गावं पाण्याखाली गेली आहेत. यापैकी चार गावांमधील नागरिकांना रात्रीच सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, रावणगाव येथील गावठाणात ८० जण अडकले आहेत. तर हसनाळ येथे नऊ जण अडकले आहेत. या सगळ्यांच्या मदतीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच एसडीआरएफ, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संपूर्ण यंत्रणेसह बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.