कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. मराठवाडामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागात 40-50 किमी प्रति तास वादळी वारे वाहण्याची ही शक्यता वर्तवली गेलीय.
वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यकता असेल तरच घरा बाहेर पडा, सखल भागात किंवा नदी, नाल्याकाठी असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याच आव्हान करण्यात आलंय.
जळगावच्या धरणगाव शहरातील धरणी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला प्रचंड पूर आल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला नदीसदृश स्वरूप प्राप्त झाले असून, कठडे नसल्याने पुराचे पाणी मोठ्या वेगाने दुकाने आणि घरांमध्ये शिरलं आहे. तर कोकण किनारपट्टीत 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान 50-60 किमी प्रति तास वेगाने वा-यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.