मुंबई: राजधानी मुंबईसह उपनगरांमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवाला राजकीय रंगाचीही जोड मिळाली, कारण आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा उत्साह दिसून आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसभर मुंबईतील १० ते १५ दहीहंडी उत्सवांना भेट देत राजकीय वातावरण तापवले.
वरळीतील परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेट देऊन त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंबई महापालिकेत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला. वरळीतील गोविंदा पथकांनी सादर केलेल्या ‘छावा’ मनोऱ्याचे कौतुक करत त्यांनी स्वतः हंडी फोडली. त्यानंतर आमदार राम कदम यांच्या घाटकोपरमधील दहीहंडी उत्सवात सहभागी होत फडणवीसांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
मुंबई: आज मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. यादरम्यान जय जवान आणि कोकणनगर दहीहंडी पथकाने दहा थर लावत विश्वविक्रम केला. इतकेच नव्हे तर ...
“यंदा महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे,” असे म्हणत फडणवीसांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ते पुढे म्हणाले की, आता महापालिकेत विकासाची हंडी लावली जाईल आणि त्यातील लोणी सर्वसामान्यांना वाटले जाईल. “आतापर्यंत महापालिकेतील लोणी कुठे जात होतं, ते तुम्हाला माहिती आहे,” असे म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली.
यावेळी वरळीच्या जांबोरी मैदानावर आयोजित परिवर्तन दहीहंडी उत्सवात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी प्रसंगांचे सादरीकरण करण्यात आले. उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमांना उपस्थित होते.
मुंबई ठाण्यासह राज्यात दहीहंडीचा जल्लोष
राज्यभरात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबईत दादरमधील आयडिअल बूक डेपो, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनीसह ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव रंगतदार झाला, तर ठाण्यातही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसे, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान अशा अनेक ठिकाणी हंड्या फोडल्या गेल्या. यंदाही मुंबईसह ठाण्यात प्रेक्षक व सहभागींची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
मुंबईत मुसळधार पावसाच्या सत्रादरम्यानही पुरुष आणि महिला गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी उत्साहपूर्ण प्रयत्न केले. ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.“२० वर्ष परंपरेची, २० वर्ष अभिमानाची” असे बॅनर्स ठाण्यात दिसून आले. हास्य जत्राच्या टीमने या दही हंडीला हजेरी लावत चार चाँद लावले. तर मराठी कलाकार चेतना भट्ट हिला कलाकार हंडी फोडण्याचा मान मिळाला.
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचून जय जवान पथकाचा विक्रम मोडला. तर मुंबईतही कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचून विश्वविक्रम प्रस्थापित केला. छत्रपती गोविंदा पथकाने ९ थर रचण्याचा प्रयत्न केला असता, तो अपयशी ठरला, परंतु यंदाच्या उत्सवात विक्रमांचा स्पर्धात्मक उधाण कायम राहिला.
वरळी जांभोरी मैदानावरील परिवर्तन दहीहंडी २०२५ हा मुंबईतील सर्वात मोठा कार्यक्रम ठरला. याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, ऍड. संतोष पांडे यांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव रंगला. गोविंदा पथकाने छावा सिनेमातील दृश्यांचे सादरीकरण करत प्रेक्षकांमध्ये उत्साह पसरवला. छत्रपती संभाजीराजेंच्या शौर्याचे बलिदान मनोऱ्यावरील सादरीकरणातून दिसून आले, ज्यावर मुख्यमंत्री फडणवीसही भारावून गेले आणि त्यांनी टाळ्या वाजवून पथकाला दाद दिली.
मुंबईत मागाठाणे येथील शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वे आयोजित हंडीत नृत्यांगना गौतमी पाटील आकर्षण ठरली. तीच्या नृत्याने गर्दीची उत्सुकता आणि ऊर्जा वाढवली. गोविंदाही त्यांच्या तालावर नाचताना दिसले. घाटकोपरमध्ये मनसे गणेश चुक्कल व अरविंद गिते मित्र परिवार आयोजित हंडीत जय जवान गोविंदा पथकाने १० थरांची दहीहंडी रचून सर्वांना थक्क केले. यामुळे ठाण्यातील कोकण नगर गोविंदा पथकाचा विक्रम कायम मोडीत काढला गेला. या थरारक कामगिरीतून जय जवान पथकाने ठाम पणे पुन्हा एकदा दाखवून दिले – “गोविंदा पथकांचे खरे राजे आम्हीच”. तर आमदार महेश सावंत यांनी आयोजित केलेल्या दही हंडी उत्सवात संयुक्त नवी चाळ उत्सव समिती या मंडळांच्या गोविंदा पथकाने आठ थराचा मानवी मनोरा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केला.
देशभरात आज दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला. मुंबईत व ठाण्यातील गोविंदा पथकांनी उंचच उंच थर रचून उत्सवाची शोभा वाढवली आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. यंदाचा दहीहंडी उत्सव साहस, जल्लोष आणि उत्साह यांचा एकत्रित संगम ठरला.
मुंबईतील दहीहंडीदरम्यान एका गोविंदाचा मृत्यू, ९२ जखमी
एकीकडे गोविंदा पथकांनी विक्रमांचे मनोरे रचले असताना दुसरीकडे मुंबईतील मानखुर्द येथे एका ३२ वर्षीय गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे, दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले असून दहीहंडीचा रोप बांधताना हा अपघात झाला. बाल गोविंदा पथकातील ३२ वर्षीय गोविंदाला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील ही दुर्घटना असून दहिहंडी रोप बांधताना तोल गेल्याने गोविंदाचा खाली पडून अपघात झाला. जगमोहन शिवकुमार चौधरी (३२ वर्षे) असं मृत्यूमुखी पडलेल्या गोविंदाचे नाव आहे.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये तब्बल ९२ जवान जखमी झाले आहे. या सर्व जखमी जवानांना महापालिकेसह सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातील ४३ जवानांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे, तर उर्वरीत जखमी गोविंदांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. त्यातील दोन गोविंदाची प्रकृती गंभीर आहे.
शहरातील जी टी रुग्णालयात २३ वर्षीय श्रेयस चाळके आणि पश्चिम उपनगरातील कांदिवली शताब्दी रुग्णालयात आर्यन यादव याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये शहर भागात ४८, पूर्व उपनगरांत १७ आणि पश्चिम उपनगरांत १९ जवान जखमी झाल्याची नोंद सायंकाळी वाजेपर्यंत विविध महापालिका रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयंमध्ये झाली असल्याची माहिती महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षातील प्राप्त आकडेवारीनुसार समोर आली आहे.
मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज तानाजी नगर येथील चाळीत बांधलेली हंडी फोडण्याचा प्रयत्नात एक लहान गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. त्याला कांदिवली पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आर्यन यादव असे बाल जवानाचे नाव असून त्यांचे वय ९ वर्षे एवढे आहे. याच्यावर सध्या उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ठाण्यात दहीहंडी उत्सवात नऊ गोविंदा जखमी
ठाण्यात दहीहंडी उत्सवादरम्यान नऊ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांपासून ते तरुणांचा समावेश आहे. सर्व जखमींवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये १८ वर्षीय आदित्य वर्मा, १३ वर्षीय कृष्णा स्वयन, १० वर्षीय समर राजभर, ५ वर्षीय निशांत सावंत आणि २६ वर्षीय सौरभ जाधव यांचा समावेश आहे. त्यांना डोक्याला, खांद्याला व हाताला दुखापत झाली आहे.
तर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये १० वर्षीय शिवराज पवार, २४ वर्षीय रोहन पागे, ३५ वर्षीय कल्पक पाटील आणि १७ वर्षीय करण पवार या गोविंदांचा समावेश आहे. यामध्ये काहींना किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी काहींवर विशेष उपचार सुरू आहेत. उत्सवाचा आनंद घेताना जखमी झालेल्या या गोविंदांच्या कुटुंबीयांवर मात्र चिंतेचे सावट पसरले आहे.