ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीसाठी १० थर लावण्याची कामगिरी कोकण नगर गोविंदा पथकाने केली तर घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या दहीहंडीसाठी १० थर लावण्याची कामगिरी जय जवान गोविंदा पथकाने केली. दहा थर लावणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. यासाठी मानवी सामर्थ्याची कसोटी लागते.हे आव्हान कोकण नगर आणि जय जवान या दोन्ही गोविंदा पथकांनी पेलले. त्यांनी दहीहंडीसाठी १० थर लावून दाखवले. या ऐतिहासिक कामगिरीसाठी आयोजकांकडून गोविंदा पथकांचा यथोचित गौरव करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी प्रो गोविंदा स्पर्धा झाली. या स्पर्धेत विशिष्ट वेळेत वेगाने थर लावणे अपेक्षित आहे. यंदाच्या प्रो गोविंदा स्पर्धेत आर्यन्स गोविंदा पथक जिंकले. कोकण नगर या गोविंदा पथकाने स्पर्धेत १० थर लावण्याचा प्रयत्न केला होता. पण अखेरच्या क्षणी त्यांचे थर कोसळले. यामुळे त्यांनी बक्षिस गमावले होते. पण दहीहंडी उत्सवाच्या दिवशी कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावण्याची किमया साधलीच. जय जवान गोविंदा पथकानेही दहीहंडीच्या दिवशी १० थर लावून सामर्थ्य दाखवून दिले.