तेव्हा जिभेवर कुलूप, तोंड उघडण्यापूर्वी निर्णय वाचून घ्या; भाजप नेते नवनाथ बन यांचे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर
मुंबई: स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी चिकन-मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या काही महानगरपालिकांच्या आदेशावरून राज्यात राजकारण तापले आहे. या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. आता या टीकेला भाजप नेते नवनाथ बन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. बन यांनी म्हटले आहे की, हा निर्णय आजचा नाही, तर १२ मे १९८८ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारनेच घेतला होता आणि तेव्हापासून तो लागू आहे. त्यामुळे या निर्णयावर टीका करण्यापूर्वी आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी इतिहास तपासावा.
'मांसाहार बंदी'चा जुना निर्णय आणि भाजपची भूमिका
नवनाथ बन यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करून म्हटले की, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती, रामनवमी आणि महावीर जयंती अशा राष्ट्रीय आणि धार्मिक महत्त्वाच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार महापालिकांना आहे. हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ठरावानुसार घेतला जातो. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही हाच निर्णय कायम ठेवण्यात आला होता, पण तेव्हा या नेत्यांच्या तोंडावर कुलूप होते, अशी खोचक टीका बन यांनी केली आहे. आता मात्र राजकारणासाठी ते 'अत्याचार' सुरू असल्याचा कांगावा करत आहेत. 'तोंड उघडण्यापूर्वी किमान जुना निर्णय वाचून घ्या,' असा सल्लाही त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका
या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली भूमिका मांडली. 'कोणी काय खावे किंवा खाऊ नये, यावर बंदी घालणे योग्य नाही,' असे ते म्हणाले. काही धार्मिक प्रसंगी, जसे की आषाढी एकादशी किंवा महावीर जयंती, अशी बंदी घातली जाते तेव्हा लोक समजू शकतात. पण १५ ऑगस्टला अशी बंदी घालणे महाराष्ट्रात योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकरणात सविस्तर माहिती घेणार असल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.
नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांवरील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ...
विविध शहरांमध्ये बंदीचे आदेश
मालेगाव महानगरपालिकेने १५, २० आणि २७ ऑगस्ट रोजी सर्व खासगी कत्तलखाने आणि मांसाहार विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये श्रीकृष्ण जयंती (२० ऑगस्ट) आणि जैन पर्युषण पर्व तसेच गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) या दिवसांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे राज्यातील बहुतेक सर्व महापालिकांनीही १५ ऑगस्ट रोजी सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.