‘कबुतरखाना’वरून गुजराती भाषिक, जैन विरुद्ध स्थानिक मराठी वादाची झालर
मुंबई : मराठी अस्मितेच्या लढ्यात उतरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता अधिक आक्रमक झाली आहे. रविवारी मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी गुजराती भाषिकांना डिवचणारा एक टिशर्ट घातला आहे. ‘परेस, नरेस, सुरेस.. चड्डीत राहायचं’ असा संदेश या टिशर्टवर लिहिला आहे. त्यात मुद्दाम गुजराती भाषिकांच्या उच्चारांचा संदर्भ देत ‘श’ ऐवजी ‘स’शब्द लिहून त्यांची खिल्ली उडवली आहे. रविवारी या टिशर्टचे छायाचित्र प्रसारित केल्यानंतर समाज माध्यमांवर जोरदार वाद विवाद सुरू
झाला आहे.
राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून मनसे आक्रमक झाली आहे. मराठीच्या मुद्द्यावर राज्यभर वातावरण पेटले आहे. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांना ठिकठिकाणी चोप दिला जात आहे. जुलै महिन्यात मीरा रोडमध्ये परप्रांतीय विक्रेत्याला झालेली मारहाण झाली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता. त्याविरोधात एकजूट दाखविण्यासाठी मराठीजनांचा मोर्चा निघाला होता. या पार्श्वभूमीवर त्याच मीरा रोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी सभा घेऊन मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला होता.
हा वाद शमला नसताना आता दादरमधील कबुतरखाना हटविण्यावरून गुजराती भाषिक, जैन विरुद्ध स्थानिक मराठी असा वाद पेटला आहे. स्थानिक मराठी भाषिकांनी कबुतरखान्याला विरोध केला आहे. गुजराती आणि जैन भाषिकांनी मागील सोमवारी दादरच्या कबुतरखान्याजवळ आंदोलन केले होते. त्याला आता मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी टिशर्टच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिले आहे. मुंबईत आता मनसे व जैन वाद नव्याने पेटण्याची शक्यता आहे.