देसले कुटुंबाचा संस्कृतीस्नेही उपक्रम
ठाणे : गणेशोत्सव हा फक्त भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, रासायनिक रंगांच्या अतिरेकी वापरामुळे उत्सवावर प्रदूषणाचे सावट पसरू लागले आहे.
या पार्श्वभूमीवर, ठाण्यातील राममारुती रोडवरील कैलास देसले कुटुंबाने बाप्पाच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास करण्याचा ध्यास घेतला आहे. शिवसमर्थ विद्यालयाजवळील त्यांच्या कार्यशाळेत गेली अनेक वर्षे गणपती मखर तयार होत आहेत.
या कामात कैलास देसले यांच्यासोबत पत्नी मनिषा तसेच मुले भाग्य आणि यश यांचाही उत्साही सहभाग असतो. कटिंगपासून फिटींगपर्यंत, नक्षीकामापासून रंगसजावटीपर्यंत-संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन मखराची कलात्मक निर्मिती करते. चित्रकार असलेला भाग्य विविध पॅटर्न्स साकारतो, तर बासरीवादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो.
कैलास देसले यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्या अनुभवाचा वापर ते गणपतीचे मखर साकारण्यासाठी करतात.
सजावटीचा केंद्रबिंदू
यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे. बांबूची चटई. बांबू ही नैसर्गिक, टिकाऊ आणि बांबू वेगाने वाढणारी वनस्पती असल्याने ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते. बांबूच्या चटईला रंग देऊन, नक्षीकाम करून, पाने-फुले-मातीचे दिवे जोडून मंदिराचा आकार देण्यात आला आहे.
पौराणिक छत्र, झुंबर, कोकणातील मंदिराची झलक, कापडी झालरी आणि लाकडी पट्ट्यांनी सजलेले सिंहासन - या सर्वांनी आरास अधिकच देखणी झाली आहे. ‘सण साजरा करताना निसर्गाचं भान ठेवणं हीच खरी संस्कृती आहे.
ही आरास केवळ सजावट नाही, तर पुढच्या पिढीसाठी एक संदेश आहे,’ असे कैलास देसले सांगतात. बाजारात चकाकणाऱ्या थर्माेकॉल आणि रासायनिक रंगांच्या आराशीत, ‘देसले’ कुटुंबाचा हा बांबूच्या चटईतून साकारलेला बाप्पाचा दरबार पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे खरे उदाहरण ठरत आहे.