लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा
पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत जाहीर केल्यानंतर असंख्य लाडक्या बहिणी एसटीचा प्रवास करताना दिसत आहे. मात्र आता याच बहिणींना एसटी महामंडळाने आणखी एक खुशखबर दिली.
आपल्या लाडक्या भाऊरायला राखी बांधायला जाताना त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रायगड एसटी महामंडळाने ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी ४० जादा गाड्या कार्यरत ठेवण्याची घोषणा केली आहे. ८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा, ९ तारखेला राखी पौर्णिमा तर ११ तारखेला परतीचा प्रवास असल्याने या तीन दिवसांसाठी एसटी महामंडळाने या जादा बसेस सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
रायगड आगारातील महाड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरुड आणि माणगाव या आठही आगारातून या बसेस सुटणार असून ४० जादा गाड्यांच्या माध्यमातून १२८ जादा फेऱ्या आणि या फेऱ्यांमधून एसटीचा १५०५६.८ किलोमीटरचा जादा प्रवास करण्यात येणार आहे.

त्यामुळे लाडक्या बहिणींना तिकिटात पन्नास टक्के सवलतीसह आता भाऊरायला राखी बांधायला जाताना जादा गाड्यादेखील मिळत असल्याने त्या दिवशीच्या वाढत्या प्रवासी गर्दीतून थोडीफार सुटका मिळणार आहे.