‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना रमी खेळत असलेल्या व्हिडीओमुळे अडचणीत सापडलेल्या माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली आणि दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. आज दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. आज मी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत, त्यामुळे मला हे खातं मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मी घेणार आहे, असंही पुढे भरणेंनी म्हटलं आहे.
मुंबई : कोल्हापूरच्या जनतेसाठी एक दिलासादायक घडामोड समोर येत आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महादेवी हत्तीणीच्या ...
राज्यात फिरून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या : मुख्यमंत्र्यांचा सल्ला
पुढे भरणे म्हणाले, कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी, "राज्यातील विविध भागांमध्ये स्वतः जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या, मी तुमच्या पाठिशी आहे," असं आश्वासन दिलं असल्याचं भरणेंनी सांगितलं.
"शेतकऱ्यांसाठी जे काही शक्य आहे, ते मी निश्चित करणार," अशी ठाम भूमिका भरणेंनी घेतली. पदभार स्वीकारताच त्यांनी MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कृषी विभागातील १४ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या पत्रावर तातडीने स्वाक्षरी केली.
इंदापूरचा शेतकरी मुलगा ते राज्याचे कृषीमंत्री!
पुण्यातील इंदापूर तालुक्यात जन्मलेले दत्तात्रय भरणे हे मूळचे शेतकरी कुटुंबातून आलेले नेते. वाणिज्य शाखेतील पदवीधर असलेल्या भरणेंनी सहकार क्षेत्रात मजबूत पाया रचला. १९९२ मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक, १९९६ मध्ये पुणे जिल्हा बँकेचे संचालक आणि २००० मध्ये अध्यक्षपद भूषवून त्यांनी सहकारात आपलं स्थान मजबूत केलं. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकून राजकारणात पाऊल ठेवलं. २०१९ मध्ये पुन्हा विजय मिळवत त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदाची धुरा सांभाळली आणि सोलापूरचे पालकमंत्री म्हणूनही काम केलं. २०२३ मध्ये पक्षफुटीनंतर त्यांनी अजित पवार गटाची साथ दिली. २०२४च्या निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील व अपक्ष प्रवीण माने यांचा १९,४१० मतांनी पराभव करत तिसऱ्यांदा विजय संपादन केला.