राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आव्हान मिळाल्यामुळे सध्या हा विषय न्यायालयात आहे. न्यायालयीन सुनावणी सुरू असली तरी मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी सातत्याने उपोषण करतात. त्यामुळे त्यांची तब्येत सारखी बिघडत असते. या परिस्थितीत मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात झाला. यामुळे जरांगेंविषयी त्यांच्या समर्थकांनी चिंता व्यक्त केली आहे.
नेमके काय घडले ?
मनोज जरांगे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी ते शिवाजीराव मेडिकल केअर रुग्णालयात गेले होते. या रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी जरांगे गेले होते. ते समर्थकांसोबत लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर जात होते. पण लिफ्ट पहिल्या मजल्यावर असतानाच अपघात झाला. लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली. लिफ्टमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांचे निवडक सहकारी होते. लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.