मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून याचाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे नगर विकास विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
२७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून ६ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे. मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, अटल सेतू आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोलनाक्यांवर ही सवलत दिली जाणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील अधिकाऱ्याने दिली.
गणेशोत्सवाला काही दिवसांचा अवधी असला तरी सरकारने टोल माफी देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली. हा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकृत निर्णय जाहीर करतील, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. टोल माफी असलेले स्टीकर्स तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरले जातील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वाहने राज्यातील ज्या जिल्ह्यातून येणार तेथील पोलीस ठाणे किंवा प्रादेशिक परिवहन खात्याकडे. पास उपलब्ध करून दिले जामतील.