मंत्री लोढा यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे गणेशोत्सव मंडळांना दिलासा
मुंबई (प्रतिनिधी): महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात बुधवारी नागरिकांच्या विविध तक्रारीवर तत्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारीचे आम्ही जागीच निराकरण करण्यात आले. जनतेचे प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दरबार आयोजित करत आहोत. मुंबईमध्ये आयोजित केलेला हा पाचवा जनता दरबार होता आणि त्याला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे, असे यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
नव्या नियमावलीनुसार गणेश उत्सव मंडळांनी मंडपासाठी खड्डा खणल्यास, मुंबई महापालिकेने १५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत असलेल्या नाराजीची मंत्री लोढा यांनी जनता दरबारात दखल घेतली. गणेशोत्सव हा आपल्यासाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा सण आहे. महापालिकेद्वारे लावण्यात आलेल्या दंडाबाबत गणेश मंडळांच्या असलेल्या भावना आम्ही जाणतो. त्याबाबत लवकर आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू', असे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे सी वॉर्डमधील खड्डे भरण्याचे काम येत्या १० दिवसांत पूर्ण करावे, असे देखील मंत्री लोढा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. नागरिकांच्या तक्रारींमध्ये पुनर्विकास, रस्ते, ड्रेनेज, रेशन कार्ड या संदर्भातील अडचणी, पाणीपुरवठा व गणेश उत्सवाबाबत परवानग्यांचे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित झाले.