परवाना देण्यापूर्वी वन्यजीवांच्या वावराची होणार तपासणी
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या ३ किमी अंतरावरील उलवे परिसरात मांस विक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानतळाच्या हद्दीत होत असलेली मांस विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, याबाबत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याबाबत पुन्हा एकदा तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीला उत्तर देताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला परवाना मिळाला नसल्याने तेथे अजून हवाई वाहतूक सुरू झालेली नाही. परवाना देण्यापूर्वी विमानतळाच्या आजूबाजूला वन्यजींवाचा वावर आहे का, हे तपासले जाईल असे जीडीसीएने सांगितले.
दोन महिन्यांपूर्वी विमानविषयक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा दावा करून पर्यावरणप्रेमींनी ही तक्रार केली होती. मांस विक्रीमुळे परिसरात कावळे, घारी आदी पक्षी आकर्षित होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी तक्रारीत नमूद केले होते.