राष्ट्रभक्तीची भावना शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाच्या सूचना
पुणे : स्वातंत्र्यदिनी राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये झेंडावंदनानंतर विद्यार्थ्यांचे कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालकांना कवायतींच्या आयोजनाबाबत परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रभक्ती , राष्ट्रप्रेमाची भावना शालेत विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना प्रभात फेरी, भाषण स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, खेळ या सारखे उपक्रम घेऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना ३१ डिसेंबर २०२४ रोजी जारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, स्वातंत्र्यदिनी कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिल्या आहेत. योग्य पेहराव करून, देशभक्तीपर पार्श्वसंगीताच्या तालवर कवायतींचे सादरीकरण करण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांनुसार, या दिवशी शाळांमध्ये किमान २० मिनिटांचे कार्यक्रम आयोजित करावेत, कवायतीमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असावा, त्याबबतचा कार्यअहवाल सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.