मुंबई: राज्यात सर्वात प्रभावी ठरत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत १२ हप्ते जारी करण्यात आले आहेत. मात्र या दरम्यान, या योजनेसंबंधित मोठा घोटाळा उघडकीस आला, ज्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या योजनेचा अनेक पुरुषही लाभ घेत असल्याचे समोर आल्यानंतर, सरकार आता संबंधित लोकांकडून पैसे वसूल करण्याची तयारी करत आहे.
जून २०२४ मध्ये, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र तेव्हापासून आतापर्यंत एकूण १२ हफ्त्यांचा लाभ अपात्र लोकांना देखील मिळाला असल्यामुळे, राज्याच्या महसुलावर देखील त्याचा ताण पडला आहे.
या पार्श्वभूमीवर, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक निवेदन जारी केले आहे की पडताळणी दरम्यान असे आढळून आले की लोक अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत, राज्य सरकारने २६.३४ लाख अपात्र लोकांना योजनेतून काढून टाकले आहे.
अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, तपासणीत असे दिसून आले की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते. काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी होते. काही प्रकरणांमध्ये, पुरुषांनीही या योजनेसाठी अर्ज केले होते. त्या पुढे म्हणाल्या की, महिला आणि बालविकास विभागाने सर्व अर्जांची पात्रता तपासण्यासाठी सर्व सरकारी विभागांकडून माहिती मागवली होती. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने सांगितले की, अपात्र असूनही सुमारे २६.३४ लाख लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
किती खाती निलंबित करण्यात आली?
इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, २६.३४ लाख अपात्र लोकांची खाती तात्पुरती निलंबित करण्यात आली आहेत. याशिवाय, सुमारे २.२५ कोटी पात्र लाभार्थ्यांना जून २०२५ चा हप्ता मिळाला आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांबाबत बोलताना तटकरे म्हणाल्या की, ‘ज्या महिलेचे अकाऊंट नव्हते, त्यावेळी त्यांनी पुरुषांचे अकाऊंट दिले का? हा एक प्रश्न आहे. अर्जांच्या छावणीतून हे समोर येईल. खरंच पुरुषांनी भरले आहेत का? बँकेत महिलेचे खाते नसेल त्यामुळे अर्ज भरलेला असू शकतो, मात्र तपासणी झाल्याशिवाय आम्ही काहीही सांगू शकत नाही. याआधी अपात्र महिलांनी अर्ज केले होते, मात्र त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.’
निलंबित खात्यांची चौकशी होणार
ज्यांची खाती निलंबित करण्यात आली आहेत त्यांच्या खात्यांची संबंधित जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी चौकशी करतील. पडताळणीत ते पात्र आढळल्यास निलंबित खात्यांना पुन्हा लाभ मिळू लागतील. चुकीची माहिती देऊन फायदा घेणाऱ्यांवर राज्य सरकार कठोर कारवाई करू शकते असे म्हटले जात आहे.
लाडकी बहीण योजनेत सर्व महिला सहभागी होऊ शकतात का?
ही योजना फक्त २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेत सामील होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सर्व विवाहित, अविवाहित, घटस्फोटित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँकेत खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. ही योजना अशा महिलांना लागू होत नाही ज्या इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत.
दरम्यान लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून. या घोटाळ्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.