नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेले ही आनंदाची बाब आहे. यात राजकीय का पाहता? आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला जाणं, यात राजकारण पाहणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आहे आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल. मात्र काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे, हे महाराष्ट्राच्या मनातलं आहे असे म्हणणे योग्य नाही. हे फार मोठे स्टेटमेंट होईल, असे सूचक विधानही फडणवीस यांनी केले.
पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या रेव्ह पार्टीवरील कारवाईत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. यावर बोलताना ते म्हणाले, मी पण ही माहिती माध्यमातून घेतली आहे, कारण मी सकाळपासून विविध कार्यक्रमांमध्ये फिरतो आहे. त्यामुळे मला ब्रीफिंग घेता आलेलं नाही. मात्र, जे माध्यमात दिसलं त्याप्रमाणे पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर कारवाई केली आहे. त्यामध्ये काही लोक सापडले आहे. त्यामध्ये काही ड्रग्स वगैरे सापडले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्ण ब्रीफिंग घेतल्यानंतर यावर बोलू शकेल. मात्र प्राथमिकदृष्ट्या असा प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी घडल्याचा दिसून येत आहे.
दरम्यान मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकांच्या मुद्यावरुन झालेल्या पत्रव्यवहाराबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. असं पत्र लिहून कोणीही वाद निर्माण करु नये. मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी मला येऊन सांगावं, त्यातील अडचण दूर करता येईल. मंत्री आणि राज्यमंत्री दोघेही शासनाचे भाग आहेत, सर्व अधिकार मंत्र्यांकडे असतात. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात, यात कुठलाही संशय नाही. मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असे मानणे हे चुकीचे आहे. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये काही धोरणात्मक निर्णय होत असतील, तर ते मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेऊ नये किंवा घेतले तर मंत्र्यांची मान्यता घेतली पाहिजे. मंत्री आणि राज्यमंत्री यांनी सामंजस्य दाखवले पाहिजे. काही अडचण असेल तर माझ्याशी बोलले पाहिजे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.