खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केलेले नाही किंवा ते जवळही बाळगले नसल्याचा युक्तीवाद
पुणे: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. खराडी येथे एका घरात चालू असलेल्या या रेव्ह पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलेकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या पार्टीत पोलिसांना गांजासदृश पदार्थ तसेच दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. या संदर्भात एकूण ७ आरोपींना अटक करून या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीत न्यायालयाने प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सरकारी वकिलांसह प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. ज्यात पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केल्याचा युक्तिवाद खडसे यांच्या जावयाच्या वकिलांनी केला. सुनावणीत कोणी काय युक्तीवाद केला? सविस्तर जाणून घेऊया
सुनावणीत दोन्ही पक्षांचा जोरदार युक्तीवाद
पुणे शहरातील आयटी पार्क परिसरात खराडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत सर्व्हिस अपार्टमेंटमधील सदनिकेत सुरू असलेल्या ड्रग पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री साडेतीन वाजता छापा टाकून कारवाई केली. या पार्टीत कोकेन,गांजा या अंमली पदार्थसह, दारु,बियर, हुक्काचे सेवन देखील केल्याचे आढळून आले. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्राज्वल खेवलकर (वय ४१) मिळून आल्याने खळबळ उडाली. जावई ड्रग पार्टीत मिळून आल्याने एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे यांची देखील राजकीय कोंडी झाली आहे. या प्रकरणी आज झालेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांसह प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. यात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर पाचही आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तर आरोपी प्रांजल खेवलकर यांचे वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी हे राजकीय षडयंत्र असून पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केले असल्याचा युक्तीवाद केला.
प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांचा युक्तीवाद
प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय षडयंत्र असल्याचे त्यांचे वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितलं. आरोपींनी कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन केलं नव्हतं. पोलिसांनीच अंमली पदार्थ प्लांट केले असावेत. आमच्याकडे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केलेले नाही किंवा ते जवळही बाळगले नसल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला. तसेच पार्टीत पोलीस साध्या वेशात येऊन गेले, आणि त्यांनीच हे सगळं केलं असावं' असेही म्हंटले आहे.
आरोपींची रुग्णालयात वैद्यकीय चाचणी
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की खराडी येथील स्टेबर्ड अझूर सूट या ठिकाणी रूम क्रमांक १०२ मध्ये काहीजण ड्रग पार्टी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या प्रकरणी दोन महिलांसह सात जणांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून अमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले. आरोपींविरोधात खराडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली असून आरोपींनी अमली पदार्थांचे सेवन केले होते का याबाबतचा निष्कर्ष अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजेल.