पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मधून दिला संदेश
नवी दिल्ली: छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे आपल्या संस्कृतीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. युनेस्कोने मराठा साम्राज्याच्या १२ किल्ल्यांना ‘जागतिक वारसा स्थळ‘ म्हणून मान्यता दिली. यापैकी अकरा किल्ले महाराष्ट्रामध्ये आणि एक किल्ला तामिळनाडूमध्ये आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला प्रत्येक दगड, प्रत्येक चिरा हा एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून दिला.
शिवनेरी, या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काही किल्ले असे आहेत की, त्यांना भेदणे शत्रूलाही शक्य झाले नाही. खांदेरीचा किल्ला तर सागरामध्ये बनविण्यात आलेला अद्भूत किल्ला आहे. हा किल्ला बनविला जावू नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूपक्ष रोखू इच्छित होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले. प्रतापगडच्या किल्ल्यामध्ये अफजल खानाला पराभवाचे पाणी पाजले होते. त्या पराक्रमांच्या गाथांचा जयजयकार या किल्ल्यांच्या भिंती, बुरूजांमध्ये आजही समावला आहे. विजयदुर्ग या किल्ल्यामध्ये गुप्त बोगदे होते. हा किल्ला म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते, याचे प्रमाण या किल्ल्यामध्ये सापडते. अनेक किल्ले ठाम पणे उभे आहेत. ते फक्त विटा आणि दगड नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. ते संस्कार आणि स्वाभिमान आहेत. मी सर्व देशवासीयांना या किल्ल्यांना भेट देऊन इतिहास जाणून घ्यावा असे आवाहन मोदी यांनी केले.
'मन की बात'च्या १२४ व्या आवृत्तीत पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'मन की बात पुन्हा एकदा देशाच्या यशाबद्दल, देशवासीयांच्या कामगिरीबद्दल बोलेल.अलिकडच्या काळात देशात, क्रीडा, विज्ञान आणि संस्कृतीमध्ये असे बरेच काही घडले आहे ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. अलिकडच्या काळात, शुभांशू शुक्लाच्या अंतराळातून परतण्याबद्दल बरीच चर्चा झाली. शुभांशू पृथ्वीवर उतरताच संपूर्ण देश आनंद आणि अभिमानाने भरून गेला.’
पंतप्रधान म्हणाले, ‘२१ व्या शतकात भारतात विज्ञान वेगाने प्रगती करत आहे. काही दिवसांपूर्वी, भारताचे देवेश पंकज, संदीप कुची, देबदत्त प्रियदर्शी आणि उज्ज्वल केसरी यांनी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये पदके जिंकली आणि देशाचे नाव उंचावले. भारत गणिताच्या जगातही आपले स्थान निर्माण करत आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाडमध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. पुढील महिन्यात, मुंबईत खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिंपियाड होणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ऑलिंपियाड असेल. भारत आता ऑलिंपिक आणि ऑलिंपियाड दोन्हीसाठी पुढे जात आहे.'
जागतिक पोलिस आणि अग्निशमन खेळांमध्ये सुमारे ६०० पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारताचे कौतुक केले. आम्ही ७१ देशांमध्ये पहिल्या तीन स्थानांवर पोहोचलो आहोत. पंतप्रधान मोदी म्हणाले की देशातील क्रीडा-संबंधित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत केली जाईल. स्वच्छ भारत मोहिमेचे कौतुक करताना ते म्हणाले की लवकरच या मोहिमेला ११ वर्षे पूर्ण होतील. ते म्हणाले की आता ते एक जनचळवळ बनले आहे. या वर्षी देशातील ४५०० हून अधिक शहरे स्वच्छ सर्वेक्षणात सामील झाली आहेत. स्वच्छतेचे उदाहरण देणाऱ्या अनेक संस्था आणि लोकांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.