महापालिका करणार पाण्याचा हिशोब
विरार : टँकरमाफीयांना फायदा व्हावा म्हणून महापालिकेकडून होत असलेला पाणीपुरवठा कमी दाबाने सोडण्याचा प्रकार विरार पश्चिम भागात आमदार राजन नाईक यांनी नुकताच उघडकीस आणला आहे. संबधित सोसायट्यांमध्ये दररोज ५० लाख लिटरहून अधिक पाणी पुरवठा होत असूनसुध्दा टँकरद्वारे पाणी मागविण्यात येत आहे. स्थानिक आणि त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा हिशोब महापालिका प्रशासन घेणार आहे.
विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी रुस्तमजी, एचडीआयएल परिसरातील गृहनिर्माण संस्थांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधणे आवश्यक होते. मात्र पालिकेची जागा नसल्याने खासगी जागेवर २० लाख ली. क्षमतेची पाणी टाकी बांधून देण्यासाठी संबंधित विकासकांना पालिकेकडून इमारत बांधकामात 'टीडीआर' वाढवून देण्यात आला.
८ ते १० वर्षांपासून टोलेजंग इमारती उभ्या असतानाही त्या ठिकाणी पालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येत नव्हता. आता ऑक्टोबर २०२४ पासून प्रतिदिन ५० लाख ली.हून अधिक पाणीपुरवठा या परिसरात करण्यात येत आहे.
असे असतानाही मागील दोन-तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. मुबलक पाणी असतानाही केवळ टँकर माफियांना फायदा व्हावा यासाठी हे सुरू आहे अशा तक्रारी अनेक रहिवाशांनी आ. राजन नाईक यांच्याकडे केल्या आहेत. त्यांनी व्हॉल्वची तपासणी केली. त्यावेळी वॉलमनकडून फक्त ५० टक्केच वॉल उघडली जात असल्याचे उजेडात आले. टँकर माफीयांचा फायदा व्हावा यासाठीच हे केले जात असल्याने या ठिकाणी पालिकेने त्यांचे वॉलमन नेमण्याची तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.