गुमला : झारखंडमधील गुमला जिल्ह्यात घाघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लावादाग जंगलात पोलीस आणि सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत बंदी घातलेल्या झारखंड जन मुक्ती मोर्चा संघटनेचे तीन नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकाने घटनास्थळावरुन एक एके ४७ रायफल आणि दोन इन्सास रायफल यांच्यासह इतर शस्त्रसाठा जप्त केला. गुमला एसपी हारिश बिन जमां यांनी ही माहिती दिली.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीआधारे जंगलात पोलीस आणि सुरक्षा पथकाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. शोधमोहीम सुरू असल्याचे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले. चकमक सुरू झाली. अखेर चकमकीत झारखंड जन मुक्ती मोर्चा संघटनेचे तीन नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरुन सुरक्षा पथकाने शस्त्रसाठा जप्त केला.
याआधी १५ जुलै रोजी बोकारो जिल्ह्यातील गोमिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरहोर्डेरा जंगलात सीपीआय माओवादी नक्षलवादी आणि सुरक्षा पथक यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी नक्षलवादी कुंवर मांझीसह दोन नक्षलवाद्यांना ठार मारले होते. कुंवर मांझीवर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. बिरहोर्डेरा जंगलातील चकमकीत कोब्रा २०९ बटालियनचा एक जवान हुतात्मा झाला.
झारखंड पोलिसांनी या वर्षी राज्य नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. झारखंडमध्ये २०२५ च्या सुरुवातीपासून पोलिसांनी २२ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. या काळात नक्षलवाद्यांकडून ११५ शस्त्रे, ८५९१ गोळ्या, १७६.५ किलो स्फोटके आणि ४,५१,०४७ रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच, १७९ आयईडी शोधून निष्क्रिय करण्यात आले. नक्षलवाद्यांविरुद्ध पोलिसांची ही एक मोठी कारवाई आहे.