कराड : पश्चिम घाटमाथ्यासह कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे कोयना धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे, अखेर धरणाचे सहा वक्री दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. हे दरवाजे पाच फुटांपर्यंत उघडून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद २०,९०० क्युसेक (घनफूट) पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर, धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेकचा जलविसर्ग कायम आहे. त्यामुळे कृष्णा- कोयना नद्यांच्या जलपातळी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
कोयनेचा जलसाठा ७९ टक्क्यांच्या समीप असताना, धरणात जवळपास ५० हजार क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या दरवाजातून पटीने विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
३१ जुलैपर्यंत धरणसाठा ७७ टीएमसी (अब्ज घनफूट) राखण्याचे धोरण धरण व्यवस्थापनाने अचानक बदलले होते. मात्र, आज शनिवारी सकाळी ११ वाजता कोयनेचे दरवाजे चार फुटांनी, नंतर ते सायंकाळी साडेपाच वाजता पाच फुटांपर्यंत उघडण्यात आले.
कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक ४९ हजार ४५५ क्युसेकवर पोहचली आहे. आज शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयना धरणाच्या जलसाठ्यात तब्बल ४.२७ टीएमसी पाण्याची वाढ होऊन हा धरणसाठा ८३.०५ टीएमसी (७८.९१ टक्के) झाला आहे, जलआवक २५,२७९ क्युसेकवरून ४९ हजार ४५५ क्युसेक अशी वाढली आहे. जोरदार पावसात आवक पाणी, विसर्गाच्या दुप्पट असल्याने कोयनेच्या दरवाजातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रमुख सर्व जलाशयांतून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होणार आहे.
पाणलोट क्षेत्रात आजवरचा विक्रमी पाऊस
कोयना पाणलोटात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत १८९ मिमी (७.४४ इंच) असा तुफान पाऊस झाला आहे. तर, यंदा आजवर सरासरी २,९७४.६६ मिमी (एकूण वार्षिक सरासरीच्या ६०.४९ टक्के) असा विक्रमी पाऊस झाला आहे. शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या कालावधीत कोयना पाणलोट क्षेत्रात महाबळेश्वरला ५१, नवजाला ३३, तर कोयनानगरला २३ मिमी, कुंभी धरण ६० मिमी, कडवी ३६, धोम-बलकवडी २६, दूधगंगा ४०, धोम १३, वारणा २१, तारळी १६ मिमी असा धरणांच्या परिसरातील पाऊस आहे. तसेच अन्यत्र, जोर येथे सर्वाधिक ८९ मिमी, प्रतापगडला ७४, पाथरपुंज ६७, दाजीपूर ६३ मिमी, रेवाचीवाडी व मांडुकली येथे ५३ मिमी असा मुसळधार पाऊस झाला आहे.